Navi Mumbai Crime : खून का बदला खून...नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचं गूढ उकललं
Navi Mumbai Crime : पाच दिवसांपूर्वी नवी मुंबईत बिल्डरच्या हत्येचे गूढ उकललं असून 25 वर्षापूर्वी घडलेल्या एका घटने
Navi Mumbai Crime : काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरुळमध्ये झालेल्या एका बिल्डरच्या हत्येचं गूढ उकलण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा बदला म्हणून बिल्डरची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सावजी पटेल (Savaji Patel) असे या बांधकाम व्यावसायिकांचे नाव होते. नवी मुंबई पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू होता. त्यानंतर आज नवी मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
या कारणाने झाली हत्या
नवी मुंबईत दिवसाढवळ्या बिल्डरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. हत्या झालेले बिल्डर सावजीभाई हे मूळचे गुजरातचे होते. त्यांनी त्यांच्या मूळ गावी 25 वर्षांपूर्वी केलेल्या एक हत्या केली असल्याचा आरोप होता. हत्या झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सूडाच्या पोटी सावजीभाईला संपवण्याचे ठरवले. हत्येच्या बदल्यात त्याच्या नातेवाईकांनी 25 लाखांची सुपारी दिली. यासाठी बिहारमधून तीन जणांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार दैनंदिन रेकी करुन सावजीभाई यांची नेरुळमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मेहेक नारिया, कौशल यादव, गौरवकुमार यादव आणि सोनुकुमार यादव या चौघांना अटक केली आहे. हत्येच्या कटात सहभागी इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
अशी झाली सावजी यांची हत्या
सावजी पटेल हे 15 मार्च रोजी आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज झाल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कारमध्ये सावजी पटेल यांचा मृतदेह आढळला. पोलिसांना घटनास्थळी तीन रिकामी काडतूस सापडले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याने पोलीस देखील सतर्क झाले होते.
याआधी बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबार
यापूर्वी देखील नवी मुंबई शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या भीषण हत्या प्रकरणं चांगलीच गाजली आहेत. सुमारे पंधरा वर्षापूर्वी वाशी येथे दीपक वालेचा, एन आर संकुल निर्माण करणारे डी. एस. राजन यांच्या हत्या झाल्या होत्या. अतुल अग्रवाल यांच्यावर गोळीबार झाला आहे. तर एस के बिल्डर्स या बड्या बिल्डरची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या हत्या प्रकरणात चकमक फेम पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती.