Amit Thackeray : अमित ठाकरेंचा अपमान केल्याने महेश जाधवांना 'प्रसाद' दिला; मनसे- माथाडी कामगार राड्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
MNS - Mathadi Kamgar Sanghatana Rada : राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे भ्रष्टाचारी असून त्यांना मराठी माणसाचं काहीही पडलं नाही असा आरोप माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला.
मुंबई: मनसे कार्यकर्ते (MNS) आणि माथाडी कामगार (Mathadi Kamgar Sanghatana) यांच्यात आज खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या (Amit Thackeray) कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. त्यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली. महेश जाधव यांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांना मारहाण केल्याचं संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सांगितलं.
नवी मुंबईत खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर आज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यावरून आता आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरूवात झाली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आपल्याला बोलावून मारहाण केल्याचा आरोप माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला.
अमित ठाकरेंचा अपमान केल्याने प्रसाद दिला
महेश जाधव यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "अमित ठाकरे यांच्याकडे महेश जाधवांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी महेश जाधव यांना जाब विचारण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी महेश जाधवांनी त्यांना उलट सुलट उत्तरं दिली. त्यांनी ज्या शब्दात अमित ठाकरे यांच्याशी वाद घातला त्यावरून मनसे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना प्रसाद दिला."
महेश जाधव यांनी केलेल्या आरोपावर बोलताना मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, "20 वर्षे महेश जाधव हे राज ठाकरेंसोबत काम करतात. गेल्या चार पाच वर्षांपासून ते अमित ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत, वेगवेगळ्या विषयांवर बैठकी घेतात. मग 20 वर्षानंतर त्यांना आता का जाणीव झाली. महेश जाधव यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत. महेश जाधवांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली."
महेश जाधवांचे आरोप काय?
महेश जाधव यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, "राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे भ्रष्टाचारी आहेत. यांना मराठी माणसाचं काहीही पडलं नाही, यांना फक्त पैशांचं पडलं आहे. मनसे फक्त पैशासाठी काम करणारी संघटना आहे. राज ठाकरे यांनी माझा मर्डर केला तरी चालेल पण मी सत्य बोलणार."
ही बातमी वाचा:
VIDEO : Sandeep Deshpande on MNS Rada : Raj Thackeray यांनी मला संपवलं तरी चालेल: महेश जाधव