शिंदे गटात येण्यासाठी धमकावलं जातंय; ठाकरेंच्या बाजूनं असणाऱ्या एम. के. मढवींचा मुख्यमंत्र्यांसह, पोलीस उपायुक्तांवर गंभीर आरोप
Maharashtra Political News : शिंदे गटात येण्यासाठी धमकावलं जातंय, असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे.
Navi Mumbai Maharashtra Political News : सध्या राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडली आणि दोन गट पडले. एक ठाकरेंचं (Uddhav Thackeray) समर्थन करणारे आणि दुसरे एकनाथ शिंदेंचं समर्थन करणारे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात चढाओढ सुरु असल्याच दिसत आहे. तसेच, दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत. अशातच आता शिंदे गटात येण्यासाठी धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे (Shiv Sena) माजी नगरसेवक एम. के. मढवी (M. K. Madhavi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पोलीस उपायुक्तांवर केले आहेत.
ऐरोली विभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक पानसरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे. यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडून एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप एम. के. मढवी यांनी केला आहे. एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी असे तीन नगरसेवक शिवसेनेतून नगरसेवक झाले होते. एकनाथ शिंदे गटात सामील न होता मढवी परिवार हे उध्दव ठाकरे यांच्या बरोबर कायम राहिले आहेत. आपण शिंदे गटात सामील होत नसल्यानं आपल्या विरोधात पोलीस कारवाई करून तडीपारीच्या नोटीसा काढल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी नगरसेवक विजय चौगुले यांचा हात असल्याचा आरोप मढवींनी केला आहे. एकनाथ शिंदे यांना पाहिजे तसा पाठिंबा शिवसैनिकांचा मिळत नसल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं खासदार राजन विचारे यांनी सांगतलं आहे. दरम्यान एम. के. मढवी यांच्यावर 13 गुन्ह्यांची नोंद असून यावर्षी तीन गुन्हे दाखल आहेत. यामुळेच तडीपारीची कारवाई होत असल्यानं मढवी आपल्यावर धादांत खोटे आरोप करीत असल्याचं पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी स्पष्ट केलं आहे.
... अन्यथा आम्ही सहकुटुंब आत्महत्या करु : एम. के. मढवी
काल (शनिवारी) शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारेंच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिंदे गटात जावं अन्यथा तुम्हाला तडीपार करून तुमचा एनकाउंटर करू तसेच, 10 लाखांची मागणी केली असल्याचा खळबळजनक आरोप आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे. पोलीस उपयुक्तांची बदली न झाल्यास आम्ही सहकुटुंब आत्महत्या करू, असा इशारा देत माझ्या कुटुंबीयांना काहीही झाल्यास याला सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक नेते विजय चौगुले, माजी आमदार संदीप नाईक आणि उपायुक्त विवेक पानसरे जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. दबाव टाकण्यासाठी खोट्या तक्रारी गुन्हे दाखल केले गेले, 18 जुलैपासून पोलीस संरक्षण काढून घेतले. तडीपार का करू नये? अशा आशयाची नटीस आपल्याला पोलिसांनी पाठवली असल्याचं मढवींनी सांगितलं आहे.