Cidco : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलत धनाढ्य बिल्डरांसाठी सिडकोची लॉटरी? माहिती मिळताच शेतकरी आक्रमक, शिरसाट म्हणाले...
Cidco Lottery 2024: गरजू, गरीब आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलत धनाढ्य बिल्डरांसाठी सिडकोची लॉटरी निघणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी आक्रमक झाले.
नवी मुंबई : नवी मुंबई शहर, उरण येथील जेएनपीटी बंदर प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभारण्यात आले. मात्र. ज्यांच्या जमिनी घेवून कित्येक अब्ज रुपये कमावणाऱ्या सिडकोला या गरीब , गरजू शेतकऱ्यंचा सोईस्कर विसर पडल्याचं चित्र आहे. सिडकोडून काढण्यात येणाऱ्या लॅाटरीत धनाढ्य बिल्डर्स, अधिकारी, राजकीय नेत्यांच्या भुखंडांचा समावेश असून शेतकऱ्यांना मात्र डावलण्यात आले आहे. या विरोधात आता प्रकल्पग्रस्त शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यासंदर्भात संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधला असता, असा निर्णय होणार नसल्याचं म्हटलं.
शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यपदी नियुक्ती झाल्या नंतर त्यांनी शहरातील धोरणात्मक निर्णय घेतले जातील असे जाहीर केले होते. यानुसार जमिनी फ्री होल्ड करणे आणि हस्तांतरण शुल्क रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्याच बरोबर लाडका उद्योगपती धोरण आणत सिडकोतील काही अधिकाऱ्यांनी 13 हजार करोड रूपयांची जमीन अल्पदरात नामवंत उद्योगपतीला देण्याचा घाट घातला होता. मात्र चौकस असलेल्या संजय शिरसाट यांनी याला ब्रेक लावत सिडकोची जमीन वाचवली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या निर्णयाने ‘ बोले तैसा चाले ‘ हे प्रत्यक्षात खरे झाले होते.
एकीकडे सिडकोच्या जमिनी वाचवणारे संजय शिरसाट दुसरीकडे बिल्डर धार्जिणे निर्णय घेणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आहे सिडको बोर्ड मिटींग मध्ये देण्यात येणाऱ्या लॅाटरीला मंजुरी. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी भुखंडाची सोडत काढण्यात येणार असली तरी या मध्ये धनाड्य बिल्डर , राजकीय नेते आणि शासकीय अधिकार्यांचे लागेबंधे असलेल्या भुखंडाचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. 40-50 वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी सिडकोला शहर वसविण्यासाठी जमिनी दिल्या त्यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत सिडकोने पूर्ण पणे भुखंड दिले नाहीत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास जमिनी नाहीत असं स्पष्टीकरण देणाऱ्या सिडकोकडे बिल्डरांना मात्र मोक्याच्या ठिकाणी भुखंड देण्यास जागा कशी मिळते असा प्रश्न उपस्थित राहतो.
लॉटरी निघणार नाही : संजय शिरसाट
उरण , द्रोणागिरी भागातील असंख्य शेतकऱ्यांना भुखंड देण्यापासून सिडकोने त्यांना ४० वर्षापासून वंचीत ठेवले आहे. सिडकोच्या या बोटचेपी धोरणा विरोधात आता शेतकरी वर्ग आक्रमक झाला असून सिडकोच्या अध्यक्षांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांना विचारले असता, त्यांनी भुखंडाची लॅाटरी निघणार नसल्याचे सांगितले. बोर्ड मिटींग मध्ये असा कोणताही ठराव पास करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इतर बातम्या :