Nashik Woman Ablaze | लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू
सदर घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेतली होती. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शासन झालेच पाहिजे, मात्र सध्या ही महिला वाचणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
नाशिक : लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या मसीना बर्न रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री 12.30 च्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. जेजे रुग्णालयात तिचे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर अंत्य संस्कारासाठी तिचा मृतदेह लासलगावला नेण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये बसस्थानकाजवळ 15 फेब्रुवारी, शनिवारी संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपीला येवला येथून अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं होतं. दरम्यान लग्नाला नकार दिल्यानं पीडित महिलेनं स्वतःला जाळून घेतल्याचा दावा आरोपीने केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बस स्थानकाजवळ उभी होती, त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या तीन जणांसोबत तिचा काहीतरी वाद झाला. विशेष म्हणजे वादानंतर महिलेने स्वतःच्या गाडीतून यावेळी पेट्रोलचा कॅन काढला आणि संशयितांसोबत झालेल्या झटापटीत पेट्रोलचा भडका उडाला. मात्र आग कुणी लावली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत महिला 67 टक्के भाजली आहे. घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने पीडित महिलेला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सदर घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेतली होती. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शासन झालेच पाहिजे, मात्र सध्या ही महिला वाचणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. बाटलीत पेट्रोल मिळणे हा अपराधच असून असं पेट्रोल पंपावर होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
संबंधित बातम्या :
Nashik Woman Ablaze : लासलगाव जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात
Hinganghat Women Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू