Nashik News : लय भारी सुनबाई! खांद्यावरील स्टार हेच माझ्या सौभाग्याचं लेणं, पीएसआय आरती सोनवणेंच्या भावना
Nashik News Update : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेल्या ‘एमपीएससी’ परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील लेकीने बाजी मारली आणि आज दहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पीएसआयची वर्दी मिळाली.
Nashik News Update : "वर्ष झालं आज, सगळ्यांना मन भरून भेटले, वडिलांच्या कष्टाचं आज चीज झालं, ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, आज खांद्यावरील तीन स्टार हेच माझ्या सौभाग्याचं लेणं' असल्याच्या भावना नुकत्याच पीएसआय म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आरती सोनवणे यांनी व्यक्त केल्या.
नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत दीक्षांत समारंभ मोठ्या आनंदात पार पडला. यावेळी आपल्या वडिलांच्या कष्टाचं चीज करणाऱ्या आरती सोनवणे या मन भरून बोलल्या.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेल्या ‘एमपीएससी’ परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील लेकीने बाजी मारली आणि आज दहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पीएसआयची वर्दी मिळाली. आरती सोनवणे मुक्ताईनगर येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्या लहान असताना त्यांचे वडील मरण पावले. मात्र, शिक्षणाची आस त्यांना पीएसआय पदापर्यंत घेऊन आली. आई आणि दोन भावांच्या पाठिंब्यावर त्यांनी शिक्षण पूर्ण करत 2016 ला एमपीएससीसाठी पुणे गाठले.
पुण्यात अभ्यासाला सुरवात केल्यानंतर सुदर्शन पवार हे गुरू म्हणून भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास सुरू ठेवत 2019 मध्ये पीएसआयची परीक्षा पास करून पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली.
अपयशही आले पण...
कुठलेही यश सहजासहजी मिळत नसते. आरती यांच्याही वाट्याला प्रथम अपयश आहे. त्यांनी 2017, 2018 मध्ये ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा दिली. या परीक्षेत यश आले नाही. मात्र, त्या खचून गेल्या नाहीत. तर दुप्पट जिद्दीने त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी 2019 च्या परीक्षेत पूर्व परीक्षा, मुख्य परिक्षेसह मुलखातील चांगल्या गुणांनी पास झाल्या.
बंधूंचा अपघात तरीही...!
आरती यांचे बंधू मुकेश सोनवणे यांनी एक प्रसंग सांगितला. आरती यांचा अभ्यास सुरू असताना आमच्या दोघा भावांचा अपघात झाला. या अपघाताने आई, मी, भाऊ खचून गेलो. पण ती खचली नाही. तिने अभ्यास करत आमच्या दोघा भावांना यातून सुखरूप बाहेर काढले. आमचे वडील लहानपणी मरण पावले. मात्र, तीच आमच्यासाठी वडील आणि आईच्या भूमिकेत होती.
पतीदेव बनले गुरू...
पुण्यात ‘एमपीएससी’ची तयारी सुरू असतानाच सुदर्शन पवार यांची ओळख झाली. ते यूपीएससीची तयारी करत होते. त्यांनी अभ्यासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. एमपीएससीचा अभ्यास सुरू असताना दोघे विवाह बंधनात अडकले. मात्र, अभ्यासावर याचा कुठलाही परिणाम झाला नाही. माझे पतीदेवच माझे गुरू असल्याने यश मिळवणे सोपे गेल्याचे आरती सांगतात.
हे स्टारच, माझ्या सौभाग्याचं लेणं
वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी माझ्यावर होती. वडील शिक्षक होते, त्यांच्या पेन्शनवर मी शिक्षण पूर्ण केले. पतीच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. असं म्हणतात की बाईंच्या गळ्यातील सोनं नाणं हे महत्वाचं असतं. पण आज माझ्या खांद्यावरील हे स्टारच माझ्यासाठी सौभाग्याचं लेणं असल्याचे आरती यांनी सांगितले.
लय भारी सुनबाई!
पहिल्यापासूनच तिने घरदार सांभाळून अभ्यास केला. आज तिला वर्दीत पाहून आनंद झाला असून मला कतृत्ववान सुनबाई भेटल्याचे आरती यांच्या सासूबाई सुनंदा पवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, आमचा मुलगाही यूपीएससीची तयारी करत असून लवकरच तो देखील आयएएस होईल.
महत्वाच्या बातम्या
हम है तय्यार! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ, शीतल टेंभे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी