(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : आदिवासी विभागाचा आणखी एक लाचखोर अधिकारी ACBच्या जाळ्यात, टॉयलेटमध्ये लाच घेताना रंगेहात पकडलं
Tribal Department : नाशिकमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असून आज आदिवासी विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईचे धडक सत्र सुरुच असून आजही आदिवासी विभागाचा (Tribal Department) अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. कळवण तालुक्यातील प्रकल्प अधिकारी प्रताप वडजेला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. हा अधिकारी चक्क टॉयलेटमध्ये लाच घेताना जाळ्यात सापडला आहे.
नाशिकमध्ये गेल्या चार दिवसात आदिवासी विकास विभागाचा आणखी एक लाचखोर अधिकारी गजाआड झाला आहे. कळवण तालुक्यातील प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे याने रोजंदारीवरील सफाईगार पद स्वयंपाकी कामासाठी नोकरी देण्याच्या बदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्रताप वजडे याला ताब्यात घेतलं.
याआधी नाशिकमधील आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला 28 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली होती. नाशिकमध्ये लाच घेताना सापडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून एकाच आठवड्यातील आजची ही पाचवी कारवाई आहे.
दोन दिवसांपूर्वी
नाशिकमध्ये जीएसटी विभागातील अधीक्षकाला आठ हजारांची लाच घेताना सीबीआय सीबीआयने रंगेहाथ पकडलं होतं. नाशिकच्या सिडको कार्यालयामधून चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) याला अटक करण्यात आली होती.
नाशिकच्या आदिवासी विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल याला एसीबीने 28 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. बागुल याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बागुल यांच्या नाशिकच्या घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणाहुन एक कोटी 44 लाखांची कॅश सापडली असल्याची माहिती आहे. ही पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला करण्यात आला.
लाच घेण्याचे प्रमाण वाढले...!
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik News) लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे होते. त्यानंतर आदिवासी विकास विभागात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या दिनेशकुमार बागुल यांनी 28 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सीबीआयच्या एसीबी पथकाने कारवाई केली. एका जीएसटी अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर चार दिवसांपूर्वी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका क्लास वन अधिकाऱ्यास लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले होते.