Nashik : इंग्रजीला घाबरायचं नाय, आता पॉलिटेक्निकचे शिक्षण मराठीतून मिळणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
Polytechnic : या वर्षाच्या अखेरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासंबंधी सर्व पुस्तकं मराठीत मिळणार असून शिक्षकांनीही मराठीत शिकवावं असं राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
नाशिक : येत्या 31 डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व पुस्तके मराठीतून मिळतील, त्यामुळे पॉलिटेक्निक शिक्षण सहज आणि सोपे होईल, विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी शक्यतो मराठी शिकवावं. ते जर इंग्लिशमध्ये शिकवणार असेल तर इंग्लिशमध्ये शिकवलेलं मराठीत भाषांतर होण्यासाठी डिवाइस देणार येणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितले. लघुउद्योग भारती नाशिक इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च 2022 स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिकमध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
दहावीनंतर पॉलिटेक्निक किंवा बारावीनंतर इंजीनियरिंग साठी प्रवेश घ्यायचा म्हटले की ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे इंग्रजीचं संकट उभे राहतं. अशात पॉलिटेक्निकची पुस्तके मराठीतून मिळाली तर नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल. आपल्या भाषेतून समजणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणे सोपे होईल. त्यामुळे मराठीतून पॉलिटेक्निकच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यासोबतच काही नवीन अभ्यासक्रम आता सुरू करण्यात येणार असून या अभ्यासक्रमांमुळे शिक्षणांबरोबर व्यक्तिमत्व विकास देखील झाला पाहिजे. शिक्षणात स्किल डेव्हलपमेंटचे विषय देखील राज्यातील विद्यापीठांनी घ्यावे, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की "आर्थिक बाबतीत आपण आता पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडला देखील आता मागे टाकले आहे. आता पाचव्या स्थानावरून पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात क्रांती झाली पाहिजे."
देशाच्या उद्योग क्षेत्राबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "देशात होणारे औद्योगिक विकासाबद्दल आपण सजग राहिले पाहिजे. आपला देश हा कृषीप्रधान देश असून दोन वेळच्या जेवणासाठीची भ्रांत होती. मात्र हरितक्रांतीच्या माध्यमातून सर्वाधिक शेतमालाचा उत्पादन भारतात करण्यात आले. शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र यावर उपाय म्हणून देशात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आज बारा कोटी लोक या उद्योग क्षेत्रात काम करत आहेत."