नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत, नाशिक पोलिसांकडून बॅन मोहीम
Makar Sankranti 2023: नाशिक शहरासह जिल्ह्यात नाशिक पोलिसांकडून दिवसेंदिवस नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री व करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
Makar Sankranti 2023: नाशिक शहरासह जिल्ह्यात नाशिक पोलिसांकडून दिवसेंदिवस नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री व करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आज झालेल्या कारवाईत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयितास नाशिक पोलिसांनी अटक करत 86 हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांती (Makar Sankranti 2023) सण आला असून या सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात. मात्र यावेळी नागरिक सर्रास बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करताना दिसून येतात. मात्र तत्पूर्वीच बाजारात बेकायदेशीर नायलॉन माजांची विक्री केली जाते. त्यामुळे प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होऊन जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे सदर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत नायलॉन मांजाच्या विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) पोलीस गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत दोधा अहिरे हा अवैधरीत्या नायलॉन मांजाची विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याकडून पांढऱ्या गोणीत असलेले 16 हजार 200 रुपयांचे नायलॉन मांजाचे 27 नगांसह ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नायलॉन मांजा विक्री करता घेऊन जात असताना मोटार सायकल वरील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 34 गट्टू जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान आतापर्यंत झालेल्या कारवाईत 61 गट्टू व एक दुचाकी असा एकूण 86 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित संशयिताकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांकडून आवाहन
नाशिक शहर पोलीस (Nashik Police) आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्त यांनी नायलॉन मांज्याची खरेदी विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. याबाबत स्वतंत्र अधिसूचनाचे अधिकारण्यात आले आहे यानुसार शहरात कोणीही या अधिसूचनेचे उल्लंघन करू नये अन्यथा त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नायलॉन मांजा खरेदी-विक्री विरोधी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.