(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion Export : कांद्यावरील निर्यात शुल्कात कपात केल्यानंतर निर्यातीला येणार वेग, नाशिक जिल्ह्यात मिळतोय 'इतका' भाव
Onion Market : कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग येणार आहे. श्रीलंका, बांग्लादेश, आखाती देश, मलेशियातून कांद्याच्या मागणीला सुरुवात झाल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले.
नाशिक : किमान निर्यातमूल्याच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यातशुल्क निम्म्याने कमी झाल्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील घाऊक बाजारात कांद्याचे (Onion) प्रतिक्विंटलचे दर 500 रुपयांनी उंचावले. शनिवारी लासलगाव बाजारात (Lasalgaon Bajar Samiti)चांगल्या प्रतिच्या कांद्याला सरासरी 4 हजार 700 रुपये दर मिळाले. तर कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग येणार आहे. श्रीलंका, बांग्लादेश, गल्फ कंट्री, मलेशिया या देशातून कांद्याच्या मागणीला सुरुवात झाल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव तीन हजार रुपयांवर गेल्याने सरकारने निर्यातबंदी लागू केली होती. आता दर चार हजारांच्या पुढे असतानाही निर्बंध हटविण्यामागील समीकरणे लक्षात घेतली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांच्या भागात मतदानावेळी सरकारने निर्यात बंदी उठवली होती. परंतु, प्रतिमेट्रिक टन 550 डॉलर किमान निर्यातमूल्य आणि 40 टक्के निर्यातशुल्क यामुळे निर्यातीतील अडसर कायम होते. केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्याचे बंधन हटवत 40 टक्के निर्यातशुल्क 20 टक्क्यांवर आणले. याचा परिणाम जिल्ह्यातील घाऊक बाजारावर झाला.
शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक लाभ होणार
मे महिन्यात चाळीत साठवलेला कांदा पावसात बराचसा खराब झाला. त्यामुळे उत्पादकांकडे फारसा कांदा नाही. व्यापारी वर्गाची साठवणुकीची क्षमता अधिक आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना अधिक होणार असल्याकडे या क्षेत्रातील जाणकारांकडून लक्ष वेधले जाते.
कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण
शनिवारी लासलगाव बाजार समितीत पाच हजार क्विटल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी 4 हजार 700 रुपये दर मिळाले. आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी याच बाजारात कांद्याला सरासरी 4 हजार 200 रुपये क्विटल भाव मिळाला होता. तर आता कांदा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कमध्ये बदल केल्यानंतर कांदा निर्यातीलाही वेग येणार आहे. श्रीलंका, बांग्लादेश,गल्फ कंट्री, मलेशिया या देशातून कांद्याच्या मागणीला सुरवात झाल्याचे कांदा निर्यातदारांनी म्हटल्याने कांद्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या