मोठी बातमी : शरद पवार गटाच्या मेळाव्यात नरहरी झिरवाळांच्या मुलाची उपस्थिती, विधानसभेच्या तोंडावर वेगळा निर्णय घेणार?
Narhari Zirwal : शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नरहरी झिरवाळ यांच्या मुलाने उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने कंबर कसली आहे. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी हजेरी लावल्याने एकाच खळबळ उडाली.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकूण सहा आमदार आहेत. यात येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, देवळालीतून सरोज अहिरे, निफाडमधून दिलीप बनकर, कळवणमधून नितीन पवार यांचा समावेश आहे. अजित पवारांच्या आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून चाचपणी केली जात असल्याचे समजते. नाशिकच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती
जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांच्या पुत्राची उपस्थिती दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गोकुळ झिरवाळ दिसून आले. नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत गोकुळ झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झिरवाळ काही वेगळा निर्णय घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
गोकुळ झिरवळ आले की नाही हे दिसले नाही, कारण भरपूर गर्दी होती. महागाई आणि बेकारी काहीही दिसले नाही, आमचं सरकार आले असते तर जीएसटी कमी करणार होतो. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगले चित्र राहील. जे दडून मदत करत होते ते आता सोबत येत आहेत. हमारे अच्छे दिन आने वाले है, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या