(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Nashik News : शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्यानं नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
नाशिक : शहरासह ग्रामीण भागात पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्यानं नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. धरणांमध्ये पुढील 28 दिवस म्हणजेच जेमतेम एक महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने येत्या आठ दिवसांत धरण परिसरात पावसाचा जोर वाढला नाहीतर नाशिककरांना पाणी कपातीला (Water Reduction) सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
नाशिक शहराला गंगापूर धरण (Gangapur Dam), मुकणे आणि दारणा या तीन धरणातून पाणी पुरवठा (Water Supply) केला जातो, यंदा जायकवाडी धरणाला (Jayakwadi Dam) 8.6 टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानं नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आरक्षित पाणी साठ्यात कपात करण्यात आली. 6 हजार 100 दशलक्ष घनफुट पाण्याची मागणी प्रत्यक्षात नोंदविली असताना तिन्ही धरणं मिळून महापालिकेला 5 हजार 314 दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आलं.
पाणीपुरवठा विभागाची चिंता वाढली
नाशिककरांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यापैकी सद्यस्थितीत केवळ 548 दशलक्ष घनफुट एवढेच पाणी शिल्लक आहे. शहरासाठी रोज 19.56 दशलक्ष घनफुट पाण्याची उचल होत असल्यानं शिल्लक पाणीसाठा 28 दिवस पुरेल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाची चिंता वाढली असून आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आलीय. गंगापूर धरणात सध्या केवळ 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ
दरम्यान, नाशिक शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार असतानाच सातपूर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जल वाहिनीला लिकेज झाल्याचा प्रकार घडला. हनुमान नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. गळतीचे लक्षात येताच जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दुरुस्तीसाठी काही काळ पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. शहराच्या इतर भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची पाणीपुरवठा विभागाने माहिती दिली. मात्र जलवाहिनी फुटल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ नाशिककरांवर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या