(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगाच्या पाठीवर आता 'शबरी'चा 'मोह'! आदिवासींच्या मिठाईने परदेशातील दिवाळी गोड
Nashik News : आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या हस्तकलेबरोबरच खास रानाची चव असणाऱ्या खाद्यपदार्थांना नवे रूप देत दीपोत्सवाचे औचित्य साधत आदिवासी मिठाईंचा गोडवा जगभर पोहोचवण्यात आला.
नाशिक : आदिवासींचा कल्पवृक्ष असणाऱ्या मोहफुलांपासून बनविलेली मिठाई, अनेकविध फुलांपासून तयार झालेले मध, धान्यांची भाकरी वा पापड नव्हे तर सुमधूर लाडू... वेगळ्या प्रकारच्या मिठाईंची ही यादी! कधीही न पाहिलेले हे पदार्थ आता 'शबरी'च्या माध्यमातून उपलब्ध झाले. आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या हस्तकलेबरोबरच खास रानाची चव असणाऱ्या खाद्यपदार्थांना नवे रूप देत दीपोत्सवाचे औचित्य साधत आदिवासी मिठाईंचा गोडवा जगभर पोहोचावा यास्तव शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न करण्यात आले.
बांबूपासून बनविलेल्या प्रकाशाच्या माळा असोत की थेट शेतातील तांदूळ, विविध फुलांपासून तयार झालेले मध असो वा ज्वारी, नागलीपासून तयार केलेले लाडू इतकेच नव्हे तर जिव्हेला अगदी नव्या चवीची अनुभूती देणारे मोह फुलापासून बनविण्यात आलेले लाडू...असे किती तरी प्रकार शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून अवघ्या जगाला मिळाले.
आदिवासी संस्कृतीला जागतिक व्यासपिठावर नवी ओळख करून देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने पावले उचलली आहेत. शबरी नॅचरल्स ही शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची संकल्पना. राज्यभरातून आदिवासी बांधवांनी हस्त कलेच्या माध्यमातून बनविलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळाले तर आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवतानाच त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होऊ शकतात ही बाब लक्षात शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून विविध प्रयास केले जात आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या वतीने राज्यभरातील आदिवासी बांधवांच्या शेतकरी उत्पादक संघटनांना निधी पुरवून त्यांना लाभ मिळेल या हेतूने वित्त पुरवठा करत असते. त्यांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या शबरी नॅचरल्स या नव्या ब्रँडखाली बाजारपेठेत उत्पादने दाखल होत आहेत. ही सारी उत्पादने शबरी नॅचरल्स या ब्रॅण्डखाली बहुंताश सर्वच ई-मार्केट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली गेली आहेत.
उद्दीष्ट चाळीस लाखांचे!
शबरी नॅचरल्स ब्रँडच्या माध्यमातून पोष्टक अन्न पदार्थ ग्राहकांना उपलब्ध होत आहे. या ब्रॅन्डचे फक्त देशातच नव्हे तर विदेशातही मार्केटींग करून त्याला ग्लोबल दर्जा प्राप्त करून दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही चाळीस लाखाचे उद्दीष्ट ठेवले असून, लवकरच हा व्यवसाय करोडो रूपयांचा टप्पा गाठेल, असा विश्वास वाटतो, असे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा