
Nashik: संजय वायकंडे हत्या प्रकरणाचा 24 तासांत उलगडा, उधार घेतलेले दोन हजार रुपये न दिल्यानं काकाने गळा आवळून केली पुतण्याची हत्या
Nashik News : काका पुतण्याने घरीच दारूची पार्टी केली. यावेळी तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या उधारीच्या दोन हजार रुपयांवरून काकाने संजय सोबत वाद घातला, मारहाणही केली.

नाशिक: नाशिकच्या (Nashik News) मेरी जलसंपदा विभागातील लिपिक संजय वायकंडे यांच्या हत्येचा 24 तासाच्या आत पंचवटी पोलिसांनी उलगडा केला आहे. काकानेच पुतण्याला मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी उधार दिलेले दोन हजार रुपये मयत संजयने परत न केल्याने हा वाद झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी असलेले 59 वर्षीय आरोपी काका निवृत्ती हरी कोरडे सोमवारी घेवडा विक्री करण्यासाठी इंदोरेहून नाशिकला आले होते. रात्री उशिर झाल्याने मेरी वसाहतीत राहणाऱ्या संजय वायकंडे या आपल्या पुतण्याकडे त्यांनी मुक्काम करण्याचे ठरवले. संजय यांची बायको आणि मुलं दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी गेल्याने काका पुतण्याने घरीच दारूची पार्टी केली. यावेळी तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या उधारीच्या दोन हजार रुपयांवरून काकाने संजय सोबत वाद घातला, मारहाणही केली. त्यानंतर संजय झोपी जाताच मध्यरात्री निवृत्ती कोरडेंनी मोबाईल चार्जरच्या वायरने त्याचा गळा आवळला. पुतण्या एकीकडे तडफडत असतांना दुसरीकडे रात्री पळून जाण्याचे कुठलेही वाहतुकीचे साधन नसल्याने काका घरातच त्याच्याशेजारी बसून राहिले आणि मंगळवारची सकाळ होताच सात वाजता त्यांनी पळ काढला.
सकाळी नऊच्या सुमारास मृत संजयची बायको आणि वडिल घरी परतताच संजयला त्यांनी जवळीलच एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र सायंकाळी शवविच्छेदन अहवालात संजय यांचा खून झाल्याचं समोर येताच खळबळ उडाली होती. पोलीस उपायुक्त अमोल तांबेंसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच पंचवटी पोलिसांनी अंत्यविधीला उपस्थित असलेल्या निवृत्ती हरी कोरडेंना सर्व विधी पार पडताच चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या. सासऱ्यानेच सूनेचे कुंकू पुसल्याने नाशिकमध्ये सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
