सियावर रामचंद्र की जय! नाशिकमध्ये आज श्रीराम आणि गरुड रथ यात्रा, काय आहे शेकडो वर्षांची परंपरा?
Nashik Ram Rathotsav : श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणारी रथयात्रा ही प्रत्येक नाशिककरासाठी औत्सुक्याचा विषय आहे. शेकडो वर्षांची परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे.
Nashik News : पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकची (Nashik) ओळख आहे. श्रीराम नवमीनिमित्त (Shri Ram Navami 2024) काढण्यात येणारी रथयात्रा ही प्रत्येक नाशिककरासाठी औत्सुक्याचा विषय आहे. तब्बल सव्वादोनशे वर्षांची नाशिकच्या रथयात्राची परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे.
चैत्र शुद्ध एकादशीला राम रथ (Ram Rath) आणि गरुड रथाची (Garud Rath) मिरवणूक काढण्यात येते. हा रथोत्सव आज शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी 5 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिराच्या (Kalaram Mandir) पूर्व दरवाजापासून काढण्यात येणार आहे. रथोत्सवासाठी श्रीराम रथ आणि गरुड रथ सज्ज झाले आहेत.
काय आहे शेकडो वर्षांची परंपरा?
सवाई माधवराव पेशवे आजारी असताना त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला होता. त्यांना बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला होता. पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे रामरथाच्या देखभालीची जबाबदारी सोपावली. रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापन करून अनेक पहिलवान घडविले होते. हे पहिलवान रथोत्सवात रथ ओढत असे. तेव्हापासून तर आतापर्यंत श्रीराम रथ ओढण्याची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे आहे.
रामा रथाचा मान पाथरवट समाजाकडे, गरुड रथाचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे
पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते त्यामुळे खडतर मार्गानेच रथ ओढला जात होता. एकदा रथोत्सवात रथ वाघाडी नाल्यातील चिखलात फसला असता पाथरवट समाजातील काही कार्यकर्त्यांनी रथ सुखरूप बाहेर काढला. तेव्हापासून रामाच्या रथाची धुरा वाहण्याचा मान पाथरवट समाजाकडे देण्यात आला आहे. श्रीराम रथाचे मानकरी हे सरदार रस्ते आखाडा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत तर गरुड रथाचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे.
रथोत्सवाचे मानकरी उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर करतात मार्गक्रमण
गरुड रथ आणि राम रथाचे मानकरी एकादशीला काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) आल्यानंतर त्यांचा फेटे बांधून सन्मान केला जातो. त्यानंतर साग्रसंगीत पूजा, आरती आणि मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर पालखीतून प्रभु श्रीरामाच्या पादुका आणि उत्सवमूर्ती पालखीतून पूर्व दरवाजाच्या बाहेर आणली जाते. रथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करतात. गरुड रथात प्रभु श्रीरामांच्या पादुका, तर राम रथामध्ये प्रभु श्रीरामाची भोगमूर्ती ठेवलेली असते. मिरवणुकीत सर्वप्रथम मानकरी बुवा, त्यानंतर पालखी, ढोल -झांजपथक त्यानंतर गरुड रथ आणि मग राम रथ असा क्रम असतो.
'जयसीता रामसीता'चा गजर करत मिरवणुकीला प्रारंभ
काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून 'जयसीता रामसीता'चा गजर करीत या मिरवणुकीला प्रारंभ होतो. उतार असलेल्या ठिकाणी रथांवर नियंत्रण राखण्यासाठी उटीची व्यवस्था असते. राम रथाची मिरवणूक म्हसोबा पटांगणावर आल्यावर तिथे राम रथ थांबतो. प्रभु श्रीराम व्रतस्थ असल्याने ते नदी ओलांडत नाहीत, अशी प्रथा असून, गरुड रथ शहराच्या अन्य भागातून फिरतो. कापड पेठेतील बालाजी मंदिराच्या इथे आरती होते. ही आरती होण्याचे कारण बालाजीवाले यांचे पूर्वज सत्पुरुष मानले जाणारे श्री तीमैय्या महाराज यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राची मंदिरात स्थापना झाली आहे.
सायंकाळपासून पहाटेपर्यंत असते मिरवणूक
त्यामुळे बालाजी मंदिरात तीमैय्या महाराज यांचा मान म्हणून आरती होते. त्यानंतर गाडगे महाराज पुलाखालील म्हसोबा पटांगणावर रथ येतो व गरुड रथाचा दांडा रामरथाला लावला जातो. म्हणजेच पूजा रामरथाला अर्पण होते. ही परंपरा वर्षानुवर्षे आजही सुरु आहे. तिथून रामकुंडाकडे ही मिरवणूक मार्गस्थ होते. रामकुंडावर प्रभु श्रीरामाच्या मूर्तीला अवभृत स्नान घातले जाते. त्यानंतर ही मिरवणूक पहाटेपर्यंत काळाराम मंदिरात येते आणि रथोत्सवाचा समारोप होतो, अशी माहिती विश्वस्थ धनंजय पुजारी यांनी दिली आहे.
नाशिकच्या वाहतुकीत बदल
आज शुक्रवारी रामरथ आणि गरुडरथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरून जाणारी व येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग
- काट्या मारूती चौकाकडून गणेशवाडीमार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारूती - पंचवटी कारंजा-मालेगाव स्टॅण्ड-रविवार कारंजाकडून इतरत्र जातील व येतील.
- काट्या मारूती चौक संतोष टी पॉइंट व्दारका सर्कल सारडा सर्कल मार्गे वाहने इतरत्र जातील व येतील.
आणखी वाचा