(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rains : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कॉलेजला निघालेली विद्यार्थिनी दुचाकीसह वाहून गेली
Nashik Rains : प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यात गाडी नेल्याने ही विद्यार्थिनी वाहून गेली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik Rains : पुराच्या (Flood) पाण्यात वाहून गेल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यात समोर आली आहे. तन्वी विजय गायकवाड असं या तरुणीचं नाव आहे. प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यात गाडी नेल्याने ही विद्यार्थिनी वाहून गेली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
तन्वी विजय गायकवाड ही तरुणी काकासाहेब वाघ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकते. तन्वी विजय गायकवाड ही विद्यार्थिनी शिवडी गावातील मामाच्या घरातून सोमवारी (19 सप्टेंबर) सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकीने निघाली होती. मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विनता नदीला मोठा पूर आला होता. पुराचं पाणी उगाव-खेडे गावादरम्यान असलेल्या पुलावरुन वाहत होतं. तरी देखील तन्वीने आपली दुचाकी पुलावर नेली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही सेकंदातच ती गाडीसह वाहून गेली. हे बघताच स्थानिक नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच असलेल्या संत जनार्दन स्वामी पर्णकुटीजवळून तन्वीला बाहेर काढण्यात आलं आणि तात्काळ निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल तर करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. तन्वी ही निफाड तालुक्यातील रुई इथल्या विजय गायकवाड यांची कन्या होती. शिक्षणासाठी शिवडी इथे मामाकडे राहून कॉलेजला येणं-जाणं करत होती.
प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे तरुण मुलीचा अशाप्रकारने मृत्यू झाल्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पूरपरिस्थिती ओढावताच प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. पुराच्या पाण्यात जाऊ नका असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र नागरिकांकडून ही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही आणि अशाप्रकारच्या घटना समोर येतात. प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यात गाडी नेल्याने तरुणीचा मृत्यू झाला.
सततच्या पावसामुळे नाशिकमधील नदी-नाले तुडूंब
नाशिकमध्ये सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडूंब झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुलावरुन पाणी वाहू लागलं आहे. शिवाय धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरु झाला आहे. याच विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे