Nashik Rain : नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग, भावली ओव्हरफ्लो, दारणातून विसर्ग वाढवला, गंगापूर धरण किती भरलं?
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर दारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
नाशिक : इगतपुरी (Igaputi) तालुक्यात व घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. पावसामुळे नदी-नाले खळाळून वाहू लागल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण (Bhavali Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच दारणा धरणही (Darna Dam) जवळपास 75 टक्के भरल्याने 8 हजार 811 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 24 लहान-मोठी धरणे आहेत. त्यातील भावली धरणाच्या (Bhavali Dam) सांडव्यावरून आता पाणी वाहू लागले आहे. हे पाणी दारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जाऊन दारणा धरणातून पुढे हे पाणी जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) जाऊन मराठवाड्याची तहान भागवणार आहे.
दारणा धरणातून विसर्ग सुरु
इगतपुरी (Igatpuri) तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे दारणा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरण जवळपास 75 टक्के भरले आहे. बुधवारी दारणा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून 8 हजार 811 क्यूसेक वेगाने दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर दारणा धरणातून विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नाशकात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता
नाशिक जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून (IMD) काही भागात रेड तर काही ठिकाणी यलो अलर्ट दर्शवण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 21.9 मि.मी. पाऊस झाला. त्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस त्र्यंबक तालुक्यात झाला तर इगतपुरी तालुक्यात 73 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गौतम तलाव भरला आहे.
गंगापूर धरणात 42.45 टक्के पाणीसाठा
दरम्यान, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणी साठ्यातदेखील आता वाढ होत आहे. गंगापूरमध्ये आता 42.45 टक्के पाणीसाठा आहे. कश्यपी धरणात 17.22 टक्के, गौतमी गोदावरी 42.56 टक्के तर आळंदी धरणात 7.23 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण समूहात एकूण 35.05 पाणीसाठा उपलब्ध आहे. नांदूरमध्यमेशवरमधून ही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 5 हजार 576 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
आणखी वाचा