Sanjay Raut On SIT : कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
Sanjay Raut On SIT : कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केला आहे.
Sanjay Raut On SIT : त्र्यंबकेश्वर प्रकरणात नव्हे तर कुरुलकर प्रकरणी एसआयटी नेमली पाहिजे. कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केला आहे. सोबतच त्र्यंबकेश्वर घटनेवर एसआयटी कसली नेमताय? रामनवमीनंतर दंगल झाली, तेव्हा एसआयटी नेमली का? असा सवालही संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis)यांना विचारला आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Visit) आहेत. नाशिकमध्ये पोहोचल्यावर ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक प्रमुख प्रचारक जो पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकतो. पण त्यावर भाजप एसआयटी नेमत नाही. नाशिकपर्यंत त्याचे धागेदोरे आले आहेत. हवाई दलाचे लोक त्यात अडकले आहेत आणि हे सगळे भाजप आणि संघाशी संबंधित आहेत. पण त्याच्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोल्यात दंगली घडवत आहात. पण महाराष्ट्र एकसंघ आहे, एकसंघ राहिल. तुम्ही दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ."
रामनवमी संदर्भात एसआयटी नेमली का? : संजय राऊत
"एसआयटी कसली नेमताय, देशात, महाराष्ट्रात काय चाललंय हे तुम्हाला माहित नाही का? रामनवमी संदर्भात एसआयटी नेमली का? रामनवमीला कधी नव्हे ते दंगली झाल्या, गेल्या ६० वर्षात रामनवमीला दंगली झाल्या नाहीत. या महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहायला हवा. दंगली घडवून राजकारण करायचं असेल तर ते कधी होणार नाही," अस संजय राऊत यांनी म्हटलं.
'त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही'
तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही, कुणीही बळजबरी घुसलं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. गेल्या 100 वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजावर धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं राऊतांनी म्हटलं. "महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा योजनाबद्ध पद्धतीने बिघडवण्याचे खेळ सुरु आहेत. जनतेचा पाठिंबा नसल्याने सरकार दंगली घडवत आहे. महाराष्ट्रात पुन्हा हिंदुत्त्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा कट दिसत आहे. आमच्या इतके हिंदुत्त्ववादी देशात कोणीही नाही. त्र्यंबकेश्वर हे आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. इथे याआधी अशाप्रकारच्या घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. कोणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशाप्रकारचं पत्र लिहायला सांगितलं. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा आहे, मंदिराच्या मुख्य दरवाजावर धूप दाखवून ते पुढे जातात," असं संजय राऊत म्हणाले.
VIDEO : Sanjay Raut : Pradeep Kurulkar हनी ट्रॅप प्रकरणावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप दंगल घडवतंय