(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Chhagan Bhujbal : 'राजीनाम्याच्या घडामोडीत मी नव्हतो... नंतर समजलं अन् धक्का बसला'; छगन भुजबळ म्हणाले...
Nashik Chhagan Bhujbal : शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नव्हती, मात्र घरातील नेत्यांना माहिती असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.
Nashik Chhagan Bhujbal : 'राजीनाम्याच्या घडामोडी संदर्भात मला माहिती नव्हती. मात्र अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल यांना कल्पना होती', अर्धा कार्यक्रम सोडून मी कोर्टात गेलो. 'तिथे मला कळाले शरद पवार यांनी राजीनामा दिला, धक्का बसला. कमिटी गठीत केली, पण मी आधीच सांगितले, कमिटी मान्य नाही. महत्वाचे म्हणजे, या राजीनाम्या (Sharad Pawar Resign) संदर्भात कुटुंबातील नेत्यांना माहिती होती', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनामा नाट्यांनंतर राजकीय घडामोडींना वेग आला, मात्र काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भाकरी फिरवल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींवर अनेक भाष्य करत तर्क वितर्क मांडले. पण ते सर्वच तर्कच राहिल्याचे शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले. आता याच राजीनामा नाट्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो, मात्र या संदर्भात अजित पवार, प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांना कल्पना होती. त्या दिवशी अचानक कोर्टात काम आल्याने अर्ध्यातून कार्यक्रम सोडून जावे लागले. त्याच ठिकाणी राजीनाम्यासंदर्भात समजले आणि धक्काच बसल्याचे भुजबळ म्हणाले.
आज छगन भुजबळ नाशिकमध्ये असून सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यांनी यावेळी राजीनामा नाट्यावर प्रकाश टाकत काही अंतर्गत घटनांचा उहापोह त्यांनी केला. ते म्हणाले की, शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणासह राष्ट्रवादी पक्षातून नेत्यांसह कार्यकर्त्यांना धक्का बसला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध होत असल्याचे समजल्यानंतर सर्वांना एकत्र करत बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वच नेते उपस्थित होते.
प्रकल्प जबरदस्तीने लादण्याची गरज नाही...
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यावर भुजबळ म्हणाले की, उद्योग येत नाही, अशी ओरड वारंवार होते. त्यामुळे जायला पाहिजे, लोकांची भावना समजून घेतली पाहिजे. उद्योग आले पाहिजे, पण त्याचा पर्यावरणला किती धोका आहे, हे तपासले पाहिजे. तसेच कोणताही प्रकल्प जबरदस्तीने लादण्याची गरज नाही. त्याचबरोबर समर्थन आणि विरोधात आंदोलन करू नये. एकमेकांना भिडण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे गेले असून त्यांना माहिती मिळाली पाहिजे, त्यानंतर ते त्यांचे मत व्यक्त करतील. तसेच उष्णतेमुळे वज्रमूठ सभा तहकूब केल्या असून रद्द करण्यात आलेल्या नाहीत. सातत्याने सभा घ्यायचा का? हा विचार ही पुढे आल्याने हा निर्णय घेतला, असल्याचे भुजबळ म्हणाले.