Nashik Crime: नाशिक विभागात 200 रुपयांपासून लाखापर्यंत मागितली लाच, तीन महिन्यात 45 कारवाया
Nashik Crime : नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने कारवाई करत जवळपास 45 सापळे रचत 70 हुन अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहर, जिल्हा आणि विभागात (Nashik Division) लाचखोरी बोकाळली असून दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे सातत्याने कारवाई होत असताना अधिकारी वर्ग लाच घेण्यापासून हात आखडता घेत नसल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्याची आकडेवारी बघता नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने धडाकेबाज कारवाई करत जवळपास 45 सापळे रचत 70 हुन अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे.
कधी मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी तर कधी सातबारा मिळवण्यासाठी, कधी कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी अशा विविध कारणांसाठी लाच स्वीकारली जात असल्याचे अधोरेखित होत आहे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत अडकले आहेत. अवघ्या तीन महिन्यांत नाशिक विभागात 45 सापळे रचत 70 संशयितांना लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. कोटींची मालमत्ता देखील जप्त करण्यासह विभागात 200 रुपयांपासून 30 लाखांपर्यंत लाच स्वीकारताना संबंधितांना ताब्यात घेत रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.
कोणतेही काम असो सरकारी असो खासगी असो, लाच घेण्यापासून अधिकारी वर्ग कचरत नाही. शासन स्तरावरील महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलीस, पंचायत समिती, अभिलेख, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये नागरिकांचे कामानिमित्त सातत्याने येणे, जाणे सुरू असते. अशावेळी अनेक कामासाठी अधिकारी वर्ग खोडा घालत असल्याने सामान्य नागरिक चिरीमिरी देऊन काम करत असल्याचे निदर्शनास येते. काही वेळा सुज्ञ नागरिक मात्र अधिकाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधून अधिकाऱ्यांची कानउघाडणी करतात.
नाशिक विभागात तीन महिन्यांत 45 सापळे...
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने होणारे प्रबोधन, तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाने केलेला पाठपुरावा, यामुळे मागील काही महिन्यांत तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. नाशिक विभागात जानेवारी ते 30 मार्च या कालावधीत नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधून आलेल्या तक्रारीची खात्री करून 45 ठिकाणी सापळे रचण्यात आले. त्यात वर्ग एकचे चार, वर्ग दोनचे पाच, वर्ग तीनचे 36, वर्ग चारचे पाच इतर लोकसेवक, खासगी 14 अशा 70 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली.
लाच मागितल्यास तक्रार करा...
कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधकच्या 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भातील फलक सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावणे अपेक्षित असताना पोलीस विभाग वगळता इतर विभागांत हा फलक दिसत नसल्याचे चित्र आहे.