Nashik Lok Sabha : नाशकात महाविकास आघाडीची ताकद वाढली, 'या' मोठ्या संघटनेचा राजाभाऊ वाजेंना जाहीर पाठींबा!
Rajabhau Waje : ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आता त्यांना एका मोठ्या संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे.
Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून तिढा कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राजाभाऊ वाजे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राजाभाऊ वाजे हे ठिकठिकाणी गाठी भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत. कालच शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आता राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढणार असल्याची चित्र आहे.
संभाजी ब्रिगेडच्या पाठींब्याने महाविकास आघाडीला बळ
संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि शिवसेना एकाच विचाराचे असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात संभाजी ब्रिगेड आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजाभाऊ वाजे यांना पाठींबा देण्याची घोषणा केली आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रफुल्ल वाघ यांनी ही घोषणा केलीये. तर महाविकास आघाडीच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले आहेत. राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित असल्याची भावना यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
नाशिकच्या जागेसाठी महायुतीत अजूनही रस्सीखेच
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतून एकीकडे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील नाशिकच्या जागेवर दावा ठोकला होता. मात्र काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून जाहीर माघार घेतली होती. त्यानंतर हेमंत गोडसे यांच्या आशा पल्लवित झाला असतानाच शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत नाशिकच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर भाजपचे दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत नाशिकची जागा भाजपलाच सुटण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा गुंता महायुतीत वाढतच चालला आहे. आता नेमकी ही जागा शिवसेना, राष्ट्रवादी की भाजपच्या वाट्याला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा