Nashik Lumpy : नाशिक जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय, 257 जनावरे बाधित, 13 दगावली, 198 पशुधनावर उपचार
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत असून जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy skin disease ) धोका वाढत आहेत.
नाशिक : सध्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत आहे. कारण, जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy skin disease ) धोका वाढत आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण 8 लाख 95 हजार 50 गोवंशीय पशुधन असून लंपी रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये वाढत असून सध्या जिल्ह्यामध्ये एकूण 49 ईपी सेंटर मधून 257 जनावरे बाधित झाली असून पशुवैद्यकामार्फत दैनंदिन उपचाराने 46 पशुधन बरे झाले असून 13 पशुधनाची मरतूक झाली आहे. सध्या उपचारामध्ये 198 जनावरे असून 100 लसीकरणासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात लंपी (Lumpy) प्रादुर्भावासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. दररोज सदर आजारी जनावरांची संख्या वाढत असल्याने आज रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून सर्व क्षेत्रिय पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक यांना शनिवार पर्यंत 100 टक्के लसीकरण करण्यासाठी सूचना दिल्या. यासाठी तालुका स्तरावर शासकिय अधिकारी कर्मचारी व खाजगी पशुवैद्यकांची मदत घेवून टिम तयार करून लसीकरण मोहिम स्वरूपात राबविण्यासाठी सुचित केले. तसेच सर्व पशुवैद्यकिय अधिकारी/कर्मचारी यांनी 24x7 मुख्यालयी उपस्थित राहून सर्व आजारी जनावरांना उपचार करण्याबाबत निर्देशित केले. सध्या जिल्ह्यामध्ये 71 टक्के लसीकरण झालेले असून शनिवार पर्यंत 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्याबाबत अधिकारी कर्मचारी यांना सांगण्यात आले.
'माझा गोठा स्वच्छ गोठा' मोहिम
नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सदर रोगावर अटकाव करण्यासाठी आपली गोठे व गोठ्याचा परीसर स्वच्छ ठेवावा, आवश्यकतेनुसार गोठे फवारणी करण्यात यावी, यासाठी 'माझा गोठा स्वच्छ गोठा' ही मोहिम सर्व ग्रामसेवक व पशुसंवर्धन अधिकारी/कर्मचारी यांनी संयुक्त विद्यमाने राबविण्यात यावी. गाई गुरे आजारी होताच तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार करावा. आजारी जनावरांना उबदार ठिकाणी, स्वच्छ जागेत बांधावे. जनावरांना स्वच्छ पाणी व मऊ लुसलुसीत खाद्य द्यावे. जनावरांच्या आहारामध्ये क्षार मिश्रणे व जिवनसत्वे 'पुरक खाद्य म्हणून देण्यात यावी.
स्थानिक पातळीवर जनजागृती
तसेच या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जन जागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही वापर करावा. लम्पी आजारावर उपयुक्त असणाऱ्या लस आणि औषधांची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करुन करावा. लम्पी चर्म आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम हाती घ्यावी, अशा सचूना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व पशुपालकांना आपल्या जनावरांना लसिकरण करून सहकार्य करावे व आपल्या जिल्ह्यामध्ये सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या बाबत खबरदारी घ्यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पशुपालकांना केले आहे.