(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी फरार, पीडितेचा मृतदेह आढळला, नेमकं प्रकरण काय?
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे
नाशिक : नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. पीडीत मुलीचाही मृतदेह आढळून आला असून तिने आत्महत्या (Suicide) केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील ही घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police) 27 सप्टेंबरला पिंपळनारे गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या 35 वर्षीय उमेश खांदवे या विवाहित इसमावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. एका वीस वर्षीय युवतीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस तपासातून ती मुलगी काही महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान या आरोपीला न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 28 सप्टेंबरला दिंडोरी पोलीस आरोपी उमेशला तपासकामी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) घेऊन गेले असता तिथून परतत असतांना नाशिक शहरातील गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने उमेश खांदवे पोलीस वाहनातून खाली उतरला आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन त्याने पळ काढला.
विशेष म्हणजे फरार आरोपीचा शोध सुरु असतांनाच रविवारी (आज) सकाळी पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी आमची मुलगी बेपत्ता झाल्याची दिंडोरी पोलिसांकडे तक्रार देताच पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आणि धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या घराजवळीलच एका विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला. मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान फरार आरोपी उमेश खांदवेचा शोध सुरु असतांनाच आरोपीच्या घराजवळ मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला एक कपडाही पोलिसांना आढळून आल्याची गावात चर्चा आहे. दिंडोरी पोलीस आणि सरकारवाडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिस या घटनेचा कसा तपास करतात आणि त्यात नक्की काय समोर येत याकडेच सगळ्यांचं लक्ष लागल आहे.
दिंडोरी तालुक्यात खळबळ
दिंडोरी तालुक्यात या प्रकाराने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील पिंपळणारे येथील उमेश खांदवे याने संबंधित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोरी पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला देखील संशयित खांदवे यास घेऊन तपास करण्यात आला आहे. याचवेळी संशयितास घेऊन जात असताना संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. अशातच संबंधित प्रकरणातील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी केल्याने आता पोलिसांसमोर प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.