फडणवीसांवर आरोप करत बोट कापलं; ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणात आरोपींना जामीन मंजूर
पोलीस पथक न्यायालयात आरोपी विरोधात ठोस पुरावे सादर न करू शकल्याने आज चारही आरोपीना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती तक्रारदार ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे.
उल्हासनगर: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आणि पंतप्रधान मोदींचे (PM Modi) नाव घेऊन मृतक भावाला न्याय देण्यासाठी बोटे कापून घेतल्याने नंदू ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणी चारही आरोपीना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे .याप्रकरणातील चार अटक आरोपींना दोन वेळा न्यायालयात हजर करण्यात आले. नंदू ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी योग्य तपास होत नसल्याने बोट कापून घेतली होती. भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नसल्यानं धनंजय यांनी कॅमेऱ्यासमोर आपलं बोटं कापली या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
उल्हासनगरमध्ये राहत असलेल्या दाम्पत्याने काही राजकीय व्यक्तींना कंटाळून आत्महत्या केली. 28 ऑगस्ट रोजी पुन्हा आरोपीना हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना 28 दिवसांनंतरही तपास करणारे पोलीस पथक न्यायालयात आरोपी विरोधात ठोस पुरावे सादर न करू शकल्याने आज चारही आरोपीना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती तक्रारदार ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे.
अटकपूर्व जामीन मिळाला
कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे असे जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख, वकील नितीन देशमुख यांनाही अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती फिर्यादी धनंजय ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे.
नंदकुमार ननावरे यांच्या भावाचं नेमकं म्हणणं काय?
नंदू ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी प्रशासनावर रोख धरला आहे. ते म्हणतायत, "माझा भाऊ आणि वहिनीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी व्हिडीओ बनवून आरोपींची नावं घेतली तरी देखील कोणताही तपास झाला नाही. 1 तारखेला माझ्या भावाने आत्महत्या केली. 18 तरखेपर्यंतही म्हणावा असा तपास झाला नाही, म्हणून मी बोट कापून घेतलं आहे."
या राजकीय नेत्यांपासून ननावरे कुटुंबाला धोका?
पुढे धनंजय ननावरे म्हणाले, "आरोपींची नावं माझ्या भावाने व्हिडिओत घेतली आहेत. त्यामध्ये खासदार रणजित नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे यांची नावं आहेत. या राजकीय पुढाऱ्यांपासून माझ्या कुटुंबियांना धोका आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे."
हे ही वाचा :