Dindori Crime : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 'खून का बदला खून', घरातील सदस्याला संपवल्याच्या रागात तरुणाला संपवलं!
Nashik Crime : तीन वर्षांपूर्वी घरातील सदस्याला संपवल्याच्या रागातून दिंडोरीत 25 वर्षीय तरुणाला संपवल्याची घटना घडली आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) शहरात दोन भावांच्या खुनाची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात झालेल्या खुनाच्या (Youth Murder) घटनेने खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी घरातील सदस्याचा खून करण्यात आल्याच्या रागात घरातील इतर सदस्यांनी मिळून जामिनावर सुटून आलेल्या तरुणाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील खुनाच्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
नाशिकसह (Nashik Crime) जिल्ह्यात सातत्याने होत खुनाच्या घटनांनी सामान्य माणसांना रस्त्यावरून चालणे मुश्किल केले आहे. कधी कौटूंबिक वादातून तर कधी पूर्व वैमनस्यातून खुनाच्या घटना घडत आहेत. कालच नाशिक शहरात लहान मुलांच्या झालेल्या किरकोळ भांडणातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन भावावर प्राणघातक हल्ला केला. यात दोघांचंही मृत्यू झाला. अशातच दिंडोरी (Dindori) तालुक्यातील कोपरगाव येथे खुनाची घटना घडली आहे. फोफाळवाडे शिवारात ठाकरे यांच्या शेतात मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. सागर भगवान लिलके (Sagar Lilake) असे या युवकाचे नाव असून आरोपींविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव नारायण पारधी यांचा मुलगा शिवाजी सुखदेव पारधी याचा सन 2020 मध्ये मयत व त्याच्या भावासह इतरांनी मिळून खून केला होता. या गुन्ह्यात मयत व इतर हे जेलमध्ये होते. ते नुकतेच जामिनावर जेलमधुन बाहेर आले होते. 9 ऑगस्टला सायंकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास नातेवाईकाचा झालेल्या खुनाच्या कारणावरून खुनाचा बदला घेत कट रचला. कोचरगाव येथील वीस ते बावीस जणांच्या टोळक्याने सागर लिलके याची हत्या केली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये 21 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कविता फडतरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मोनिका जेजोट या करीत आहेत.
2020 मध्ये काय घटना घडली होती....
नवरात्र उत्सवात देवी विसर्जनाच्यावेळी शिवाजी पारधी हा कोचरगाव येथील देवीची मूर्ती ठेवलेली पिकअप गाडी चालवत होता. यावेळी संशयित आरोपी सोमनाथ काळू टोंगारे याच्या गाडीला शिवाजीच्या गाडीचा कट लागला. यामुळे त्यांच्यात वाद झाले होते. यावरून मागील भांडणाची कुरापत काढत 3 जानेवारी 2020 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बारा जणांच्या जमावाने शिवाजी पारधी या तरुणाच्या छातीत लोखंडी चॉपर खुपसला आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली. यात शिवाजी पारधी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
इतर महत्वाची बातमी :