Nashik News : आगामी निवडणुकांसाठी वंचित मैदानात, प्रकाश आंबेडकर यांचा उद्यापासून महाराष्ट्र दौरा, असा आहे संपूर्ण दौरा
Nashik Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. राज्यातील लातूर, सातारा, बीड आदी जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात ते दौरा करणार आहेत.
नाशिक : सध्या आगामी लोकसभांच्या (Loksabha) दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अनेक राजकीय पक्ष तर युतीपेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्धार करत आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वच पक्ष सक्रिय झाले असून राजकीय, सभा मेळावे जोरदार सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडी देखील येत्या निवडणुकांमध्ये रणशिंग फुंकणार असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते नाशिक दौरा देखील करणार असल्याने नाशिकमधील वंचित बहुजन आघाडी पक्ष कामाला लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसा सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे गट, शिवसेना (Shivsena), मनसे, वंचित बहुजन आघाडीसह सर्वच पक्षांनी गावागावात, शहराशहरात जात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीने देखील महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील मैदानात उतरले असून उद्यापासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यात राज्यातील लातूर, सातारा, बीड आदी जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात ते दौरा करणार आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा शहरात त्यांचा दौरा असणार असून ग्रामीण महाराष्ट्रापासून शहरी भागापर्यंत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीने काही महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) गटाशी युती केली. मात्र महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट नसल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. त्यांनतर हळूहळू वंचितने जाहीर सभा, मेळावे, मोर्चे घेऊन तळागाळात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर जाऊन पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) देखील दौरे, मेळावे घेण्यास सुरवात केल्याचे दिसते आहे. त्यामुळे आताच महाराष्ट्र दौरा महत्वपूर्ण असणार आहे. काही महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक शहरात जाहीर सभा घेत समुदाय एक करण्याचे काम केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा साद घालण्यासाठी ते नाशिकला येत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांचा महाराष्ट्र दौरा
दरम्यान उद्यापासून प्रकाश आंबेडकर यांचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. उद्या लातूर जिल्ह्यात दौरा असणार असून यात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संवाद साधणार आहेत. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी सातारा दौरा, 11 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याचा दौरा तर 28 ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा असणार आहेत, यात प्रामुख्याने सटाणा शहरात जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे हा दौरा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे.
इतर महत्वाची बातमी :