Prakash Ambedkar: आदित्य ठाकरे ठाण्यातून एकनाथ शिंदेंविरुद्ध लढल्यास...., प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
1 सप्टेंबर रोजी वंचितनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र लिहिलं . मात्र आजपर्यंत काँग्रेसकडून पत्राला कोणतंही उत्तर आलं नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय.
मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे आव्हान दिले त्यानंतर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुका ठाण्यातून लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) यावर भाष्य केले आहे. आम्ही युतीत असलो आणि आदित्य ठाण्याकडून उभे राहिले तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.
मी युतीधर्म पाळणार : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत आम्ही युतीत असलो आणि आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक जर ठाण्यातून लढवली तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी मी युतीधर्म पाळणार. मी पॉलिटिकल क्लिअर आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा अदानींसंदर्भात नरोबा, कुंजोबा सुरु आहे तसं आमचं नाही.
इंडिया आघाडीत सहभागी होण्याबद्दल काँग्रेस अध्यक्षांना पत्र
प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी देखील माहिती दिली. 1 सप्टेंबर रोजी वंचितनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र लिहिलं होतं तसेच ईमेल देखील केला होता. पत्रात आम्ही आम्हाला इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं आहे, असे म्हटले होते. तसेच ज्या अटी असतील त्यासोबतच आम्ही बोलणी करण्यास तयार आहे . मात्र आजपर्यंत काँग्रेसकडून पत्राला कोणतंही उत्तर आलं नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
2024 च्या निवडणुकीबाबत काँग्रेसमध्ये स्पष्टता नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हायचं असेल तर 272 खासदार निवडून आणावे लागतील. मात्र 272 खासदार निवडून आले नाही तर मोदी पंतप्रधान होणार नाही. सरकार कोणाचं असेल हे सांगता येणार नाही. कारण त्यावेळच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर ते अवलंबून असणार आहे. इंडियात किंवा मविआत फॉर्म्युल्याची चर्चा होत नाही, त्यामुळे दाल मे कुछ काला है असं वाटतं. पुढच्या पाच वर्षाचे नियोजन आरएसएस आणि भाजपचे सुरु झालेत. ते देशासाठी घातक आहेत. आगामी 2024 च्या निवडणुकीत जी स्पष्टता पाहिजे ती काँग्रेसमध्ये दिसत नाही. मोदी, आरएसएसविरोधात काय धोरण आहे ते इंडियानं ठरवलेले नाही अशी परिस्थिती आहे
पंकजा मुंडे प्रकरणात अजित पवारांनी तेल टाकण्याचं काम केलं
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयानं मोठी कारवाई केलीये यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंकजा मुंडेंची नाराजी होती हे बरोबर आहे. मात्र अजित पवारांनी तेल टाकण्याचं काम केलं आहे. अजित पवार यांनी खासदार मराठा असेल असं म्हंटलं. अजित पवार यांचं याबद्दल कौतुक आहे ते ऐवढे अडचणीत असूनही भाजपला देखील डिक्टेट करत आहे.
हे ही वाचा :