Nashik Crime : धार्मिक नगरी की ड्रग्सचं माहेरघर, तीन दिवस कारवाई, पाच कोटींचं एमडी ड्रग्स जप्त, नाशिकमध्ये चाललंय काय?
Nashik News : शेतीचे साहित्य, औषध ठेवण्याच्या नावाखाली गाळा भाडेतत्त्वावर घेतला होता आणि त्यात ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरु होता.
नाशिक : धार्मिक नगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या नाशिकची (Nashik) ओळख आता ड्रग्सचे माहेरघर अशी होऊ लागलीय का? अशी भिती आता व्यक्त केली जात आहे. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) कारवाई, त्यानंतर नाशिक पोलिसांनी टाकलेली धाड, या तीन दिवसांच्या कारवाईत जवळपास 5 कोटी रुपयांची 4 किलो 780 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आणि कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या कारवाईने जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली.
मागील दोन दिवस पुण्याच्या (Pune) ससून रुग्णालयातून पळालेला ललित पाटील याची चर्चा होती. मात्र त्यानंतर अचानक नाशिक शहराजवळील शिंदे गाव (Shinde Village) अचानक चर्चेत आलं. याला कारण ठरले आहे ते एमडी ड्रग्स.. शिंदे गावात गेल्या दोन दिवसात मुंबई पोलीस आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या दोन कारवायांमध्ये कोट्यवधींचे एमडी ड्रग्स (MD drug) आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी श्री गणेशाय नावाच्या एका कंपनीत सुरु असलेल्या ड्रग्सच्या कारखान्यावर छापा टाकला आणि सुमारे 300 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केल्याची चर्चा आहे. पुण्यातून ललित पाटील फरार झाल्यानंतर तीन दिवसात नाशिकमध्ये पोलिसांकडून (Nashik Police) करण्यात आलेल्या तीन कारवाया आणि त्यात हस्तगत करण्यात आलेला शेकडो कोटींचा 'माल' चर्चेचा विषय ठरला आहे.
जवळपास दोन महिन्यांपासून शिंदे गावात ड्रग्ज निर्मितीचा (Drug Factroy) धंदा सुरु होता. विशेष म्हणजे गोडाऊन मालक दत्तू जाधव यांच्याकडून संजय काळे नामक इसमाने शेतीचे साहित्य, औषध ठेवण्याच्या नावाखाली हा गाळा भाडेतत्त्वावर घेतला होता आणि त्यात काहीतरी संशयास्पद कारभार सुरु असल्याची शंका येताच आणि शुक्रवारी मुंबई पोलिसांनी शिंदे गावात केलेल्या कारवाईनंतर नाशिक पोलिसांनी भाडेतत्वावर दिलेल्या कंपन्यांची, गाळ्यांची माहीती देण्याचे आवाहन करताच दत्तू जाधव यांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी ईथे छापा टाकला. तर आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री नाशिक शहरातील वडाळा गावात एमडी ड्रग्स विक्रीच्या संशयावरून नाशिक पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक करत त्यांच्याकडून 54.5 ग्रम एमडी आणि 1 किलो 288 ग्रॅम गांजा हस्तगत केला होता आणि त्यानंतर दोनच दिवसात शिंदे गावात झालेल्या दोन कारवायांमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत म्हणाल्या....
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत म्हणाल्या की, मुंबई पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी कारवाई केली होती. एमडी सदृश्य पदार्थ जप्त केले होते. त्यानुसार त्या भागात आम्ही शोध मोहीम सुरू केली होती. बंद गोडाऊन, फॅक्टरी याबाबत माहिती देण्याचे आवाहन केलं होते. दत्तू वामन जाधव या जागा मालकाने आम्हाला माहिती दिली. 5 कोटी 86 लाख रकमेचे 4.780 किलो एमडी ड्रग्ज आम्ही ताब्यात घेतले. यातून तीन आरोपींचे नाव निष्पन्न झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. पाच किलोच्या दरम्यान ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईत ललित पाटीलचा संबंध नाही, पण कांबळे नावाच्या व्यक्तीचा सहभाग दिसून येत असल्याचे पोलीस म्हणाले. निर्मनुष्य अशी वास्तू होती, म्हणून लक्षात आले नाही. या संदर्भात नाशिकरोडला गुन्हा दाखल केला असून कांबळे, संजय काळे, शिंदे ही संशयित नावे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. एफसीएलचा अहवाल आला की कारवाई करू, असं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं.
छगन भुजबळ म्हणाले...
'मला सुद्धा ही धक्कादायक न्यूज आहे, दोन दिवसात 500-600 कोटीचा ड्रग्स सापडत. एकाच गावात, जिल्ह्यात, एकाच शहरात, नाशिकमध्ये सापडते, औषध बनवण्याचा कारखाना असेल असं दाखवलं असेल, त्या डिपार्टमेंटच्या लोकांना, स्थानिक पोलिसांना कसं हे समजलं नाही. त्यांच्या लक्षात आले नाही की, हे वेगळे प्रकरण आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा ड्रग्स नशा करणाऱ्यापर्यंत आणि जगभर गेले असतील ते करणाऱ्यापर्यंत... आता त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होत आहे, मला काही कल्पना नाही, कोणाचं दुर्लक्ष झाले असेल, जर सरकार दरबारी सांगितलं गेलं तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचे असल्याचे भुजबळ म्हणाले.
नाशिकची ओळख आता ड्रग्सचे माहेरघर?
एमडी ड्रग्सची नाशिकमध्ये सर्रासपणे विक्री होत असल्याची चर्चा असतांनाच तीन दिवसातील या तीन कारवायांमुळे धार्मिक नगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या नाशिकची ओळख आता ड्रग्सचे माहेरघर अशी होऊ लागलीय का? अशी भिती व्यक्त केली जात असून स्थानिक पोलीस आणि ईतर शासकीय यंत्रणा याबाबत अनभिज्ञ कशा? असा सवाल नाशिकचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तर मूळचा नाशिकचा असलेला ड्रगमाफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला आणि त्यानंतर नाशिकमध्ये झालेल्या या कारवाया सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. एमडी ड्रग्सचे मोठे रॅकेट राज्यभरच नाही तर देशभर कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून यात कोणा कोणाचा सहभाग आहे? ड्रग्समाफियांमागे कोणाचा वरदहस्त आहे? या आणि इतर गोष्टींचा मुंबई आणि नाशिक पोलीस आता कसा तपास करतात हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी :