Nashik Ganeshotsav : कोणत्याही सार्वजनिक मंडळांना वर्गणी मिळणार नाही, नाशिकच्या मखमलाबाद ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद निर्णय
Nashik Ganeshotsav : कोणत्याही सार्वजनिक मंडळांना आता वर्गणी मिळणार नसल्याचे पत्रकच मखमलाबाद ग्रामपंचायतीने जारी करण्यात आले आहे.
नाशिक : गणपती (Gauri Ganpati) म्हटलं की जल्लोष उत्साह, कार्यकर्त्यांची धावपळ, सजावट डेकोरेशन यासंह अनेक मंडळाकडून आजूबाजूच्या लोकांकडून आपला गणपती म्हणून वर्गणी मागितली जाते. यातून गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र या सगळ्यांना आळा घालण्यासाठी नाशिक शहरातील मखमलाबाद (Makhamalbad) गावाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोणत्याही सार्वजनिक मंडळांना आता वर्गणी मिळणार नसल्याचे पत्रकच जारी करण्यात आले आहे.
गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2023) अवघ्या काही दिवसांवर आला असून सर्वदूर जय्यत तयारी सुरु आहे. नाशिक (Nashik) शहरातही मोठी तयारी सुरु असून यंदा अनेक मंडळाचे नवनवे देखावे नाशिककरांसाठी पर्वणी ठरणार आहे. गणेशोत्सव किंवा कोणताही सण उत्सव म्हटला की सार्वजनिक मंडळे लोकसहभागासाठी वर्गणी मागतात. मात्र अलिकडील काळात मंडळांची वाढती संख्या आणि त्यामुळे वर्गणीसाठी लागणारा भुदंड ही सर्वच ठिकाणी समस्या आहे. नुकतंच पुण्यात (Pune) एका किराणा दुकानदाराला वर्गणी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील मखमलाबाद येथील ग्रामस्थांनी तोडगा काढला असून कोणत्याही सार्वजनिक मंडळांना आता वर्गणी मिळणार नाही आणि कोणी मागितलीच तर संबंधितांकडूनच दंड आकारण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मखमलाबाद ग्रामपंचायतीने घेतला आहे.
मखमलाबाद परिसरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, सन 2023 मध्ये होणाऱ्या सर्व सार्वजनिक उत्सवाच्या देणग्या कुठल्याही मंडळाला देण्यात येऊ नये, असा ठराव मखमलाबाद ग्रामविकास मंडळाच्या मिटींगमध्ये घेण्यात आला. तसेच खालील प्रमाणे विविध विषय देखील मंजुर करण्यात आले. त्यानुसार मखमलाबाद मेनरोड, शाळा, बसस्टॉप वरील जागेवर गाड्या व्यवस्थित पार्किंग कराव्यात, मखमलाबाद टपरी धारकांनी (नाल्या लगतच्या) आपआपल्या टपऱ्या आपल्या जबाबदारीवर काढून घ्याव्यात. त्याठिकाणी रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) चे काम सुरु करण्यात येणार आहे. मखमलाबाद मेनरोडवर भाजीपाला विकी धारकांनी देवीमंदीर जवळील जागेत म.न.पा.च्या जागेत बसण्याची व्यवस्था करावी. अनावश्वक होर्डींग बाजी करु नये, जेने करून मखमलाबाद स्टॅण्ड खराब होणार नाही. कुठल्याही मंडळाने डीजे वाजवू नये, वाजवल्यास जप्त करण्यात येईल. अशा पद्धतीने पत्रक काढण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला निर्णय
मखमलाबाद परिसराचा झपाट्याने कायापालट होत आहे. परिसरात इमारती वाढत आहेत, ग्रामस्थांनी आपल्या गावावरील आपुलकी अजून ही तशीच टिकून ठेवली आहे. परंपरागत चालत आलेले नागपंचमी जत्रा असो की कुस्त्याची दंगल यातून ग्रामस्थांची एकीचे दर्शन होते. गावात अनेक राजकीय पक्ष आहेत. राजकीय हेवेदावेदेखील आहेत; पण गावाचा निर्णय घेण्याची वेळ आली की सर्व एकत्र येऊन निर्णय घेण्याची परंपरा जैसे थे आहे. गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. वाढत्या शहरीकरणातही संस्कृती परंपरा टिकविण्याचा आम्हा ग्रामस्थांचा प्रयत्न असतो, गावाच्या हितासाठी आजही ग्रामस्थ उभे राहतात. गावात सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने विविध सण उत्सव यात्रा साजऱ्या करतात, अनेक मंडळे उभे राहिले असून वर्गणी गोळा करणे आदी प्रकारातून भविष्यात वाद उद्भवू नये, यासाठी ग्रामविकास मंडळाने घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे.