नाशिक गोळीबार प्रकरण! आधी रेकॉर्डवरील गुन्हेगार अन् आता भाजपच्या माजी नगरसेवकाच्या नावाची चर्चा
Nashik Crime News : यावेळी हा नगरसेवक मद्यधुंद अवस्थेत होता असेही बोलले जात आहे. त्यामुळे, पोलिसांच्या तपासात आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
नाशिक : शहरातील पवन नगरमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या (Firing) घटनेचा पोलिसांकडून तपास करण्यात येत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे आरोपीची ओळख पटवली असून, गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित माले याने हा गोळीबार केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, माले हा फरार झाला आहे. विशेष म्हणजे, या घटनेवेळी सिडको परिसरातीलच भाजपचा (BJP) एक माजी नगरसेवक देखील तिथे उपस्थित होता, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी हा नगरसेवक मद्यधुंद अवस्थेत होता असेही बोलले जात आहे. त्यामुळे, पोलिसांच्या तपासात आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
नाशिक शहरातील पवन नगरमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याच्या आवाजाने परिसरात घबराट पसरली होती. काही वेळातच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नव्हते. पण, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा होती. त्यामुळे पोलीसांना विचारणा होऊ लागली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, ज्यात एक टोळके दिसून आले. धक्कादायक म्हणजे या व्हिडिओत रोहित माले या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने समोरील ईसमांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अंबड पोलिसांनी सुमोटो कारवाई करत रोहित माले विरोधात प्राणघातक हल्ला आणि शस्त्र अधिनियम कायद्यानूसार शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेवकाची जोरदार चर्चा...
पोलिसांकडून सध्या रोहित मालेचा शोध घेतला जातो आहे. विशेष म्हणजे, या घटनेवेळी सिडको परिसरातीलच भाजपचे एक माजी नगरसेवक तिथे उपस्थित होता, अशीही जोरदार चर्चा रंगली आहे. हा नगरसेवक मद्यधुंद अवस्थेत होते असेही बोलले जाते आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करतायत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय-काय समोर येणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
रोहित मालेचा शोध सुरु...
नाशिक शहरातील पवन नगरमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना समोर आली होती. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत तत्काळ माहिती दिली. परंतु, पोलिसांना घटनास्थळी काहीच मिळाले नाही. मात्र, नागरिकांनी गोळीबार झाला असून, याच तपास करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली आणि प्रत्यक्षात गोळीबार झाला असल्याचे समोर आले. दरम्यान, हा गोळीबार रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित मालेने केला असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. सध्या माले फरार झाला असून, पोलिसांकडून त्याच शोध घेतला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: