Nashik: 100 एकरावरचा कांदा तणनाशक फवारणीमुळं नष्ट, रात्री उशीरा कृषीमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर
कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

Nashik: कांद्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अडचणी काही कमी होण्याचे दिसत नाही. देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे सुमारे 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झाले. कांद्याच्या भावावरून गेले अनेक महिने शेतकऱ्यांची ओरड सुरू असतानाच देवळा तालुक्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. शंभर एकर कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच कृषिमंत्री रात्री उशिरा थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले होते. तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सक्त सूचना केल्या आहेत. यावेळी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक दमाले यांना संबंधित कंपनीचे उप्तादीत औषधांचे परीक्षण करण्याच्या तसेच बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Onion damage)
नक्की झाले काय?
देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे सुमारे 100 एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झाले आहे. या मोठ्या नुकसानीची माहिती मिळताच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या नियोजित दौऱ्याला थांबवत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. कृषिमंत्री कोकाटे यांनी रात्री उशिरा बाधित शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून प्रत्यक्ष पाहणी केली. मंत्री कोकाटे यांनी संबंधित तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सक्त सूचना दिल्या. यावेळी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याचे निर्देश दिले. नुकसान ही संबंधित कंपनीच्या तणनाशक उत्पादनातील चुकांमुळे झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे कृषिमंत्री कोकाटे यांनी कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
आधीच आयातशुल्कानं होरपळले, आता नुकसानाची भर!
भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी (Onion Export) सर्वाधिक कांदा निर्यात बांगलादेशमध्ये (Bangladesh) होते. गेल्या वर्षी 20 % तर त्याआधीच्या वर्षी 17 % कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता. परंतु, आता बांगलादेशमध्ये जानेवारी अखेरीस स्थानिक शेतकऱ्यांचा (Farmers) कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार असल्याने बांगलादेश सरकारने 16 जानेवारीपासून कांदा आयातीवर (Onion Import) 10% टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे चिंतेचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा भारतीय बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही जातो. पण आधीच आयातशुल्कानं होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्यांवर नुकसानाची भर पडल्याचे चित्र आहे.























