Nashik Crime : घरगुती वाद, अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट, नांदगाव हादरले
Nashik Crime News : घरगुती वाद व अनैतिक संबंधातून पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नांदगावमध्ये घडली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.
Nashik Crime News नाशिक : घरगुती वाद व अनैतिक संबंधातून खुनाची धक्कादायक घटना नांदगाव (Nandgaon) तालुक्यात घडली आहे. पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने पतीचा काटा काढला असून 24 तासांच्या आत नांदगाव पोलिसांना (Nandgaon Police) घटनेची उकल करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (54, रा. वाघोरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांची घरगुती वाद व अनैतिक संबंधातून पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने डोक्यात दगड घालून व लाकडी दांडक्याने मारहाण हत्या करण्यात आल्याची घटना नाशिकच्या (Nashik News) नांदगाव येथील जातेगाव (Jategaon) येथे घडली.
संगनमत करून रचला खुनाचा कट
संशयित पत्नी पल्लवी दीपक सोनवणे, मेहुणी व मेहुणीचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे (रा. म्हसवे, ता. पारोळा) यांनी संदीप (रमेश) महादू लोखंडे (रा. शेजवळ, ता. मालेगाव), साईनाथ बाबुलाल सोनवणे, लखन बाबुलाल सोनवणे (रा. पिंप्री हवेली, ता. नांदगाव) यांच्याशी संगनमत करून खुनाचा कट रचला. त्यानुसार दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले. या ठिकाणी लाकडी दांडक्याने व डोक्यात दगड मारून ठार केले. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून देत प्रेत झाडावर टाकून असा अपघाताचा बनाव करत सर्वांनी पोबारा केला होता.
चार जणांना 24 तासाच्या आत अटक
घटनास्थळी अपघाताचे चित्र दिसत असले तरी त्याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आधारकार्डवरून मयताची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून खुनाचा उलगडा झाला. सोनवणे व मोरे परिवारातील सहा जणांनी ही हत्या केल्याचे आणि पत्नीदेखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. तर 24 तासांच्या आत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अल्पवयीन मुलांचाही गुन्हेगारीत सहभाग वाढत आहे. अलीकडे नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षा चालकाचा खून करण्यात आला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. आता नांदगाव तालुका खुनाच्या घटनेने हादरला आहे. शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
आणखी वाचा