Nashik Crime : कर्तव्य बजावून घरी जाताना एपीआयचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; नाशिक पोलिस दल हळहळले
Nashik Crime : लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलला दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सोनोने कुटुंबासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे,

नाशिक : नाशिकच्या (Nashik Crime) देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुंदन सोनोने या अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सोनोने कर्तव्य बजावून घरी जात असताना वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या टेम्पोचा सोनोनेंच्या दुचाकीला धक्का लागल्याने सोनोने खाली पडून गंभीर जखमी झाले. लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलला दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सोनोने कुटुंबासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत अधिक तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मागील तीन महिन्यांपासून एपीआय पदावर कुंदन सोनोने (रा. इंदिरानगर) कार्यरत होते. दिवसभरातील कर्तव्य बजावून झाल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने (एमएच-15-सीवाय-4140) घराकडे निघाले असतानाच वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ सोनोने यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट लष्कराच्या ट्रकच्या चाकाच्या पाठीमागून खाली शिरली. अपघात झाल्याचे लक्षात येतात चालकाने जागीच ब्रेक लगावला. यानंतर तत्काळ सोनोने यांना जवानांनी गाडीच्या बाहेर काढत रुग्णालयात हलवले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिक पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. ते नेहमीच बोला प्रभू असे म्हणत असत. त्यामुळे एक प्रकारे बोला प्रभू आवाज हरपल्याची भावना नाशिक पोलीस दलात व्यक्त होत आहे. ते 2000 सालच्या बॅचचे अधिकारी होते. गेल्या 23 वर्षांपासून ती पोलिस दलात सेवा देत होते.
टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच पुणे-नाशिक (Pune- Nashik Highway) महामार्गावर संगमनेरमध्ये टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला होता. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली. अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले, त्यामुळे एका महिलेचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने अकोले तालुक्यातील एका दोन वर्षीय चिमुकलीसह चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
