(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात, टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.
नाशिक : पुणे-नाशिक (Pune- Nashik Highway) महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात झाला आहे. टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करत असताना अचानक टेम्पो त्या कारवर कोसळल्याची घटना रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टोयोटा कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले, त्यामुळे एका महिलेचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने अकोले तालुक्यातील एका दोन वर्षीय चिमुकलीसह चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
चार जणांचा मृत्यू
ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष, सर्व या.अकोले) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. यावेळी नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या घटनेने संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.
परभणीत ट्रॅक्टर आणि क्रुझरचा भीषण अपघात
परभणीच्या (Parbhani) यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला असून, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अडकलेली क्रूजर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रात्रीचा प्रवास सुरु असतानाच भाविकांच्या क्रुझर आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. ज्यात, एकूण 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, इतर 6 भाविक देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.