नाशिकच्या हरसूलजवळ लक्झरी बसला भीषण अपघात, तीसहून अधिक जखमी
Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल पेठ रस्त्यावर लक्झरी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Bus Accident : नाशिकसह जिल्हाभरात अपघाताचं सत्र सुरूच आहे. आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल पेठ रस्त्यावर लक्झरी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास 30 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गुजरात राज्यातील राजकोट येथून सहा खासगी लक्झरी बस देवदर्शनासाठी महाराष्ट्रात आलेल्या होत्या. दुपारी त्र्यंबकेश्वर येथील दर्शनानंतर या सर्व बसेस परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या होत्या. त्या हरसूल मार्गे पेठ मार्गे गुजरातकडे रवाना होणार होत्या. हरसूलवरून पेठकडे जात असताना खरपडी गावाजवळील घाट ओलांडत असताना यातील एका लक्झरी बसच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. नियंत्रण सुटल्यानंतर ही लक्झरी बस सोबत इनोव्हा कारला धडकली. त्यानंतर उलटली. या घटनेत जवळपास 30 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. यातील दहाहून अधिक गंभीर जखमींना नाशिक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येत आहे तर उर्वरित वीसहुन जखमींना हरसुलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सायंकाळी साडे पाच सहाच्या वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघाताची माहिती समजल्यानंतर तातडीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात 20 हून अधिक जखमींना दाखल करण्यात आले आहे. यावेळी हरसूल येथील अनेक खासगी डॉक्टर्स देखील जखमींवर उपचार करत असून जिव्हाळा फाऊंडेशन सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी जखमींना रुग्णालयात पोहचवण्यास मदत केली.
आणखी वाचा :