Dinkar Patil on Sudhakar Badgujar : भयमुक्त देश भाजपला करायचा होता अन् गुन्हेगारांनाच प्रवेश; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर मनसे नेत्याचा हल्लाबोल
Dinkar Patil on Sudhakar Badgujar : ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता या पक्ष प्रवेशावर मनसे नेत्याने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Dinkar Patil on Sudhakar Badgujar : ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. या प्रवेशावर विरोधकांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. आता नाशिकमधील मनसेच्या (MNS) नेत्यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी निवेदन दिले आहे. भाजपकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्यांना पक्षात प्रवेश दिला जातो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहेत. या गुन्हेगारीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केला आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांनी विरोध करूनही भाजप वरिष्ठांनी सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेतले त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच नाशिकमधील गुन्हेगारीला जबाबदार असल्याचं मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले दिनकर पाटील?
दिनकर पाटील म्हणाले की, भ्रष्टाचार मुक्त देश, भयमुक्त देश हा भारतीय जनता पार्टीला करायचा होता. मात्र आता कोणाचे प्रवेश चालू आहेत? असेच प्रवेश जर का चालू असतील तर गुन्हेगारी कशी कमी होणार? बडगुजर यांच्याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमली होती. अनेक नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले. भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. मात्र त्यांचा प्रवेश झाला. भाजपकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्यांना पक्षात प्रवेश दिला जातो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहेत. या गुन्हेगारीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. नितेश राणे यांनी एक व्हिडिओ देखील रिलीज केला होता. पण, त्यानंतर जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर चौकशीअंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. ते शिवसेनेत असतानाच हे झाले, ते तेव्हा भाजपमध्ये आले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्याविरुद्धचे उमेदवार ते होते. शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दाखवली. शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेली आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचे स्वागत करतो. त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल, ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती नियमांनी वागले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
आणखी वाचा























