Dada Bhuse : 'राऊत शिवसेनाप्रमुख होण्याचं स्वप्न बघातायत', दादा भुसेंचे घणाघाती आरोप
Dada Bhuse : संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसेंवर केलेल्या आरोपांचं त्यांनी प्रत्युत्तर दिलं असून राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
मालेगाव : संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनाप्रमुख होण्याचं स्वप्न बघत आहेत, असं म्हणत मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मालेगावी (Malegoan) केलेल्या आरोपाचा पालकमंत्री दादा भुसे यांनी जोरदार समाचार देखील घेतला. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर शिवसेना खासदार संजय खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहोचले.
मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यावर दादा भुसे यांनी राऊतांवर मानहानीचा दावा केला होता. या दाव्यानंतर संजय राऊत हे शनिवार 2 डिसेंबर रोजी मालेगावच्या न्यायालयात हजर राहिले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करुन पुढील सुनावणीसाठी 3 फेब्रुवारी ही तारीख दिली. दरम्यान यावेळी खासदार राऊत हे मालेगाव न्यायालयात असाताना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राऊत काही स्वातंत्र्यसैनिक नाहीत, दादा भुसेंचा पलटवार
राऊतांवर जामिनासाठी मालेगावात यावं लागलं. ते काही स्वातंत्र्यसैनिक नाहीत. त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यामुळे त्यांना मालेगावात येऊन माफी मागावीच लागेल. राऊतांना मालेगावाची माफी मागावी लागेल, असं म्हणत मंत्री दादा भुसेंनी राऊतांवर निशाणा साधला.
राऊत दलाल आहेत - दादा भुसे
संजय राऊत हे दलाल आहेत. त्यांनी शिवसेनेचं मीठ खाल्लं .शिवसेनेचे मीठ खायचे अन राष्ट्रवादीची दलाली करायची. त्यांना मुख्यमंत्री होण्याची देखील स्वप्न पडत असल्याचा गंभीर आरोप यावेळी मंत्री दादा भुसे यांनी केला. मी देखील बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. नोटीशीला मी घाबरत नाही. राऊतांनी इतर ठिकाणी नौटंकी दाखवावी. पोपटपंची करून कोणी आमदार होत नाही त्यासाठी जनतेत जावे लागते. मालेगावचा आमदार कोण होणार हे राऊत नाही, तर मालेगावची जनता ठरवेल, असं दादा भुसे म्हणाले.
'अद्वय हिरेंची बाजू घेताना लाज नाही का वाटत?'
ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करण्यात आलीये. यावर देखील मंत्री दादा भुसे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, अद्वय हिरेंनी जिल्हा बँकेची फसवणूक केलीये. गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांची लूट केलीये. अशा अद्वय हिरेंची बाजू घेताना राऊतांना लाज नाही का वाटत.