Nashik Landslide : नाशिकच्या पेठ तालुक्यात रस्त्याला तडे, डोंगरांना भेगा, जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दहा कुटुंबांचे स्थलांतर
Nashik Landslide : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पेठ तालुक्यात (Peth Taluka) झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) डोंगर खचले असून काही भागात रस्त्यांना मोठ्या भेगा गेल्याचे समोर आले आहे.
Nashik Landslide : नाशिक (Nashik) जिल्ह्यात दहा दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, रस्ते खचले, गावांचा संपर्क तुटला. तर दोन दिवसांपूर्वी पेठ तालुक्यात (Peth Taluka) झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर खचले असून काही भागात रस्त्यांना मोठ्या भेगा गेल्याचे समोर आले आहे. यामुळे येथील नागरिकांना स्थलांतरित (Migration) करण्यात आले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील दहा दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या काही दिवसांत जिल्ह्यातील पेठ तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंदही करण्यात आली. तालुक्यातील जोगमोडी येथे तर एकाच दिवशी ४४८ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान याच तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ या भागात अतिवृष्टीमुळे डोंगरांना, रस्त्यांना भेगा गेल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती पेठ तहसीलदार यांना मिळताच त्यांनी हि बाब जिल्हा प्रशासनाला कळवली.
स्थानिकांच्या सांगण्यानुसार पेठ तालुक्यातील घोटविहीरा व उंबरमाळ येथील 100 मीटर रस्त्याला तडे गेले असून माती ढासळण्यासह झाडे उन्मळून पडल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनापर्यंत हि बाब गेल्यानंतर येथे राहणाऱ्या नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्याचा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिले असून त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेले काही दिवसांपासून जिल्ह्यातील पेठ तालुक्याला अतिवृष्टीने झोडपून काढले असून तीनशे किलोमीटरच्या पुढे विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसांच्या सतत धारेमुळे घोटविहीरा व उंबरमाळ रस्त्याला तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
पेठचे तहसीलदार संदीप भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट दिली असून तेथे राहणारे ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांचे तात्काळ स्थलांतर करून त्यांना दिलासा दिला आहे. घोट विहिरा व उंबरमाळ गावाला लागून असलेल्या दरीच्या खालच्या भागात माती ढासळल्याने रस्त्याला तडे जाणे व झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
दहा कुटुंबांचे स्थलांतर
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी तात्काळ या भागातील वास्तव्य करणाऱ्या दहा कुटुंबांचे स्थलांतर रिकामी घरे, समाज मंदिर व खरपडी येथील आश्रम शाळेत करण्यात आले आहे. तसेच त्यांची भोजन व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी गंगाधर डी यांनी सांगितले आहे.