Nashik Red Alert : नाशिक जिल्ह्यास गुरुवारपर्यंत रेड अलर्ट, 700 मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता
Nashik Red Alert : नाशिक (Nashik0 शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम असून गुरुवारपर्यंत रेड अलर्ट (Red Alert) हवामान विभागाच्या (Weather Report) वतीने देण्यात आला आहे.
Nashik Red Alert : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम असून जिह्याला रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. पुढील चार दिवस गुरुवारपर्यंत हा रेड अलर्ट हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मागील तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यास (Nashik District) धुवांधार पावसाने झोडपून काढले आहे. सर्वत्र पावसाने (Heavy Rain) हाहाकार केला असून नदी नाल्याना पूर आला आहे तर अनेक भागात पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भाग असलेला त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कायम असून आता पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील धारण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून 10 हजार क्युसेकने विसर्गही करण्यात येत आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील उत्तर पश्चिम पट्ट्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच गंगापूरमधून विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. तर जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक आदी परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर निफाड, देवळा, चांदवड, मालेगाव, सिन्नर या तालुक्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर येवला, नांदगाव या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वरील अंदाज 11 ते 15 जुलै या तारखांसाठी आहेत. या काळात नाशिक जिल्ह्यातील घाटाच्या भागात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगररांगांमध्ये असणाऱ्या गावांनी ही सतर्क राहावेअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
'इतका' पाऊस होण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फोरकास्ट या युरोपियन हवामान मॉडेल नुसार. नाशिकसह जिल्ह्यात 300 ते 700 मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची नितांत गरज आहे.
गोदाकाठी सतर्कतेचा इशारा
नाशिकची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या होळकर पुलाखालून 7 हजार क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शिवाय दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे.