(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard : 'रोड किल' थांबणार कधी? भरधाव वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहराजवळील मखमलाबाद-मातोरी (Makhamalabad) रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा (Leopard Dies) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहराजवळील मखमलाबाद मातोरी रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा (Leopard Dies) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा बिबट्याचा रोड किलचा (Leopard Road Kill) प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील मखमलाबाद मातोरी रस्त्यावर भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास धडक दिली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत बिबट्याने जीव सोडला होता.
नाशिक शहराच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याचा वावर वाढला असून दरी, मातोरी, मखमलाबाद मळे परिसर असल्याने बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. सोमवारी सायंकाळी अंदाजे तीन ते चार वर्षाची बिबट मादी मुंगसरा रस्ता ओलांडत होती. यावेळी एका भरधाव जाणाऱ्या वाहनाने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्याचा पाय व कमरेस जबर मार लागला. बिबटया रस्त्यावर कोसळून काही वेळात बेशुद्ध पडला. रेस्क्यू टीमला माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले मात्र तत्पुर्वीच बिबट्याचा मृत्यू झाला होता.
रोडकिल थांबणार कधी? सध्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरी (Igatpuri), गिरणारे, दरी-मातोरी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. येथील नागरिकांना दर दिवस आड बिबट्याचे दर्शन होते. या भागात मुख्य रस्ते आणि मळे परिसर असल्याने बिबट भक्ष्याच्या व पाण्याच्या शोधार्थ रस्त्यावर येतो. अशावेळी भरधाव वाहने धडक देऊन पसार होतात. बिबट्याच नाहीतर इतरही वन्यप्राण्यां संदर्भांत रोड किलच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बेळगाव परिसरात तरस या प्राण्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरस वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला होता.
वाहन धारकांचे सूचना फलकांकडे दुर्लक्ष
नाशिक वनविभागाने (Nashik Forest) बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात म्हणजेच त्र्यंबक रोड, गिरणारे हरसूल रोड आदी परिसरात सूचना फलक लावले आहेत. मात्र वाहनधारक सर्रास या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र या घटनांवरून दिसून येते. तर काही भागांत सूचना फलक लावणे आवश्यक असल्याचे दिसते. कारण या सूचना फलकांची संख्या अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. वनविभागाने तातडीने याबाबत जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गिरणारे परिसरात दहशत
नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून गिरणारे परिसरात तर बिबट्याची दहशत ही कायम आहे. काल मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोपट थेटे यांच्या घराबाहेर झोपलेल्या दोन कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करत त्यांना ठार केले. ही सर्व घटना घराबाहेरच असलेल्या सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे.