Nashik Sinner News : कामाचं चीज झालं! सेवानिवृत्त होत असलेल्या शिपायाला तहसीलदार खुर्चीवर बसवतात..!
Nashik Sinner News : सेवानिवृत्त होत असलेल्या शिपायाला तहसीलदारांनी आपल्या खुर्चीत बसवून कार्याचा अनोखा सन्मान केला आहे.
Nashik Sinner News : आपल्या आयुष्यातील मेहनतीचे फळ हे कधी ना कधी मिळतेच. त्यामुळे माणसाने आयुष्यात फळाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करत राहणं आवश्यक असते. अशावेळी माणसातली माणुसकी आपल्याला माणूसपण शिकवत असते. याच उत्तम उदाहरण सिन्नर (Sinnar) शहरात घडलं आहे. सेवानिवृत्तीच्या दिवशी तहसील कार्यालयातील (Sinner Tahsil Office) शिपाई बाळासाहेब गवारे यांना थेट तहसीलदारांच्या खुर्चीत बसवून त्यांच्या कार्याचा अनोखा सन्मान सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी केला आहे.
आपण ज्या कार्यालयात किंवा इतर तत्सम ठिकाणी काम करत असतो, अनेक वर्षांची मेहनत करतो, अनेक आठवणी या कार्यालयाबरोबरच्या, संबंधित ठिकाणावरच्या आपल्यासोबत असतात. अनेक सहकारी तयार होत असतात. कुठेतरी सेवानिवृत्तीच्यानंतर माणूस या सर्व कामातून बाहेर पडतो. अशावेळी आपल्या कष्टाचं मोठं योगदान सहकारी वर्ग, कार्यालय लक्षात ठेवतं. याच भावनेतून नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सिन्नरच्या तहसिल कार्यालयात काम करणारे शिपाई बाळासाहेब गवारे (Balasaheb Gaware) यांचा सन्मान करण्यात आला. येथील तहसीलदार एकनाथ बंगाळे (Eknath Bangale) यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी शिपाई गवारे यांना त्यांच्या खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
दरम्यान सिन्नरच्या तहसील कार्यालयात बाळासाहेब गवारे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आज बुधवार रोजी त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम होता. याच पार्श्वभूमीवर ते कार्यालयात हजर झाले होते. यावेळी तहसीलदारांनी माणसुकीचे दर्शन घडवत त्यांना आपल्या खुर्चीत बसवले. सुरवातीला गवारे यांना संकोच वाटला. मात्र तहसीलदारांनी केलेल्या आग्रहामुळे ते संपूर्ण दिवस तहसीलदारांच्या दालनात असलेल्या खुर्चीत बसून होते. तर त्यांच्या बाजूच्या असलेल्या खुर्चीत बसून तहसीलदार बंगाळे यांनी कामकाज सांभाळले. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील मूळ रहिवासी असलेले गवारे सुरुवातीला नांदूरशिंगोटे गावात कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना शिपाई पदावर पदोन्नती मिळाली. तेव्हापासून ते गेली 40 वर्षे सिन्नर तहसील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असून तहसीलदारांच्या दालनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
चाळीस वर्षाच्या कष्टाचं चीज....
दरम्यान तहसीलदाराच्या दालनाची नियमित स्वच्छता करण्याबरोबरच तहसीलदारांना भेटण्यासाठी येणाऱ्या आगंतुकांचे आदरातिथ्य करण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. तहसीलदारांच्या दालनात सुनावण्या सुरू असतील, तर गवारे मामा दरवाजात बसून भेटीसाठी येणाऱ्या त्याबाबत सांगायचे. चाळीस वर्षांच्या सेवेत अनेक तहसीलदारांचा सहवास लाभलेल्या गवारे यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस सर्वांच्या आठवणीत राहावा, यासाठी तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी त्यांचा अनोखा सन्मान केला. तहसीलदार बसत असलेली खुर्ची गवारे यांना देऊन त्यांना दिवसभर त्या खुर्चीत बसवण्यात आले. आणि त्यांच्यासमोर असलेल्या बाजूच्या खुर्चीत बसून तहसीलदारांनी संपूर्ण दिवसभराचे कामकाज केले. दिवसभर तहसीलदारांना भेटायला येणाऱ्यांसाठी हा सुखद धक्का होता. ज्या शिपायाने तहसीलदारांच्या खुर्चीची काळजी वाहिली. त्याच खुर्चीवर त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस सन्मानपूर्वक जावा, हे सर्वांसाठी अनपेक्षित होते.