Nashik Sanjay Raut : ईडी जाऊ द्या, साध्या पोलिसांकडून चौकशी करा सगळं हाती येईल; संजय राऊतांचा भुसेंना टोला
Nashik Sanjay Raut : दादा भुसे यांची ईडी आधी पोलिसांकडून चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
Nashik Sanjay Raut : पालकमंत्र्यांवर आरोप केले नसून सत्य सांगितले आहे. भाजप नेते इतरांकडून हिशोब मागतात, त्या पोपटलालांनी इथे यावे आणि पालकमंत्र्याकडून हिशोब मागावा. ईडी आधी साध्या पोलिसांकडून चौकशी केली तरी, भरपूर हाती येईल, असं सांगत संजय राऊत यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांना टोला लगावला आहे. तसेच पोलिसांकडून चौकशी करण्याची मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
आज उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची जाहीर सभा मालेगावमध्ये (Malegaon) होत असून या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. अशातच विधानसभेचे अधिअवेशन सुरु असताना संजय राऊत यांनी ट्विट करत आरोप केले की, गिरणा अग्रो (Girana Agro) नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले, अशा आशयाचे ट्विट करत लवकरच स्फोट होईल असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आज संजय राऊत यांनी पुन्हा या संदर्भात भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांनी पालकमंत्र्यांकडून हिशोब मागावा असे ते म्हणाले आहेत.
संजय राऊत यावेळी म्हणाले की, मी पालकमंत्र्यांवर आरोप केले नाही, सत्य सांगितले. पालकमंत्री यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना संदर्भात शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतले. हिशोब दिला नाही, पैसे कुठे आहेत, कोणत्या नेत्यांशी डिल केले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, हा प्रश्न आम्ही विचारला तर गैर काय? हा हिशोब दिला पाहिजे. भाजप नेते इतरांकडून हिशोब मागतात, त्या पोपटलालांनी इथे यावे आणि पालकमंत्र्यांकडून हिशोब मागावा. ईडी नंतर, आधी साध्या पोलिसांकडून चौकशी केली तरी भरपूर हाती येईलअसे सांगत दादा भुसे यांच्या चौकशीची मागणी संजय राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मालेगाव शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. म्हणून मालेगांवला सभा घेत आहे. इकडचे लोक पार्श्वभागाला पाय लावून पळाले म्हणून, जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकताच अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नवी संजीवनी मिळाली आहे. देश अखंड आहे, फोडा जोडा, चालणार नाही. उध्दव ठाकरे महाराष्ट्र आणि देशाच्या प्रश्नांना जाहीरपणे उत्तर देण्यासाठी येत आहेत. मी राजीनामा देईल, मात्र तुम्ही आधी शिवसेनेच्या मतावर निवडून आलात, आधी तुम्ही राजीनामा द्या, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेन मतदान केले. तुम्ही कसे पाय लावून पळून गेलात. तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही शिवसेनाचे आमदार नाहीत, निवडणूक आयोगाने चिठोरे दिले असल्याचे सांगत संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणाऱ्या शिंदें गटाच्या आमदारांना संजय राऊत यांनी आव्हान दिले आहे.
अद्वय हिरे मंत्री होतील...
दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आता मालेगावला नवी संजीवनी मिळाली आहे. ते मालेगावचे पुढचे आमदार असतील. शिवाय 2024 मध्ये अद्वय हिरे मंत्री होतील, विकासाला प्राधान्य देणारा मंत्री लाभेल, कमिशनखोर मंत्री नसेल. सिमेंट पासून साखर कारखानापर्यंत कमिशन घेतले, पालकमंत्री म्हणजे मिस्टर 40 परसेंट असल्याचे सांगत दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.