Nashik Sanjay Raut : नाशिकमध्ये संजय राऊतांच्या सुरक्षेसाठी ठाण्याचे पोलीस पथक; पत्राप्रकरणी राऊतांचा जबाब
Nashik Sanjay Raut : नाशिकमध्ये संजय राऊतांच्या सुरक्षेसाठी ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाले असून त्यांचा जबाब घेतला जात आहे.
Nashik Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आज एका उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शिवाय संजय राऊत यांनी जीवाला धोका असल्याचं पत्र ठाणे पोलीस (Thane Police) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले होते. त्यामुळे आज नाशिकमध्ये (Nashik) ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाले असून त्यांचा जबाब घेतला जात आहे.
अमित शाहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी नाशिकमध्ये शिंदे गटाचे (Shinde sena) नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून (Nashik News) पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे काल संजय राऊत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र ठाणे पोलिसांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिले होते. सिन्नरच्या एका कार्यक्रमासाठी संजय राऊत आज नाशिकमध्ये दाखल झाले असून संजय राऊत यांच्यासोबत 3 पोलीस कर्मचारी आणि एक वाहन सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.
सध्या संजय राऊत यांनी दिलेल्या पत्रानंतर ठाण्याहून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे सहा ते सात जणांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. तसेच त्यांच्या रूमच्या बाहेरही पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे. एसीपी दर्जाचे अधिकारी संजय राऊत यांचा जबाब घेत आहेत. शिवाय नाशिकमध्ये राऊत यांच्यांविरोधात गुन्हा दाखल आणि आंदोलन झाल्यानंतर सुरक्षा देण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील स्वागत कमानीच्या उद्घाटनासाठीसंजय राऊत जाणार आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुरक्षा मागितली नाही...
संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि कल्याणचे खासदार आहेत. गुंड राजा ठाकूर याला ही सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती असावी म्हणून मी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मी कोणत्याही प्रकारची सुरक्षा मागितलेली नाही. ज्या आमदार आणि खासदारांना पक्षातून फोडण्यात आलं त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.