(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : सरकारला धारेवर धरणाऱ्यांना असंच संपवणार का? संजय राऊतांचा राज्य सरकारला प्रश्न
Sanjay Raut : "सत्तेतील नेते, आमदार, खासदार धमकीची भाषा वापरतात. हा कट फक्त माझ्याबाबतीत नाही तर येणाऱ्या काळात अजूनही काही गोष्टी उघड होतील, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय.
मुंबई : "हे सुपारी बाजांचं राज्य आहे का? जे तुमच्या विरोधात बोलतात त्यांना तुम्ही अशा प्रकारे संपवणार आहात का? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय. आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आहे. या आरोपानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"सत्तेतील नेते, आमदार, खासदार धमकीची भाषा वापरतात. हा कट फक्त माझ्याबाबतीत नाही तर येणाऱ्या काळात अजूनही काही गोष्टी उघड होतील. मी कोकणातील पत्रकार शशीकांत वारीसे यांच्या कुटुंबींयांचे देखील भेट घेतली आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना संपवलं जात आहे. सरकार बदलल्यानंतर विरोक्षी पक्षातील लोकप्रतिनिधींची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर हल्ला झाला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली, काँग्रेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, आता मला मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. याबाबत माझी व्यक्तीगत तक्रार नाही. परंतु, राज्यात काय चालल आहे हे जनतेला आणि राज्यकर्त्यांना समजण्यासाठी मी तक्रार दिली आहे. तुरूंगात असणाऱ्या गुंडांना जामानावर सोडून त्यांना असे टास्क दिले जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून आपल्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई आणि ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती मला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. माझी सुत्रे ही अतीशय विश्वसनीय असतात. त्यामुळे माझ्यावर लवकरच हल्ला होण्याची शक्यता आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
सुरक्षा मागितली नाही : संजय राऊत
माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती असावी म्हणून मी गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मी कोणत्याही प्रकारची सुरक्षा मागितलेली नाही. ज्या आमदार आणि खासदारांना पक्षातून फोडण्यात आलं त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या