Nashik News : दोन दिवस वॉच ठेवला, वेशांतर केले अन् थेट धाड टाकली, नाशिकच्या वनविभागाची कारवाई
Nashik News : नाशिकमध्ये पंचवटी परिसरात संशयित विक्रेत्याला वनविभागाच्या दक्षता पथकाने ताब्यात घेतले आहे.
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) वन्यप्राण्यांच्या तस्करीचे प्रकरण समोर आले असून शहरातील पंचवटी परिसरात संशयित विक्रेत्याला नाशिकच्या वनविभागाच्या दक्षता पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर संशयितांकडून हरणांच्या शिंगाचे तुकडे, साळींदरचे काटे व इतर वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये सप्टेंबर महिन्यात अंबोली परिसरात बिबट्याच्या कातडी (Leopard) तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी वनविभागाने मोठ्या शिताफीने संशयितांना ताब्यात घेतले होते. तर आजच्या कारवाईत पंचवटी परिसरात (Panchavati) गोदाकाठावर असलेल्या जडीबुटी विक्रेत्यांविरुद्ध नेहमीच वनविभागाला तक्रारी (Nashik Forest) प्राप्त होत होत्या. याबाबत दक्षता विभागाला माहिती मिळाल्यानंतर विभागीय अधिकारी विशाल माळी यांच्या फिरत्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे.
सापळा रचून दुकानावर छापा
दरम्यान पंचवटी परिसरात संशयित धनेश टेकम हा पंचवटी परिसरात इंद्रजाल समुद्र प्राणी, वन्यजीवांची शिंगे, वन्यप्राण्याचे नखे अवैधरित्या विक्री करत असल्याचे दक्षता पथकाला समजले. त्यानुसार सापळा रचून विभागीय वनअधिकारी विशाल माळी, हर्बल पारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक, संजय पवार यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांच्या पथकाने सापळा रचून गस्ती दरम्यान संशयित धनेश टेकम यांच्या दुकानावर छापा टाकून कार्यवाही करुन ताब्यात घेतले. शिवाय त्याने विक्रीसाठी मांडलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यास वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयात आणून वन्यजीव कायद्यांर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाईत काय काय आढळले?
दरम्यान या कारवाईत मृत स्टार कासवाचे 36 नग खवले आढळून आले आहेत. तसेच इंद्रजाल 17 नग, साळींदरचे काटे 15 नग, हरणांच्या शिंगाचे तुकडे 06 नग, वन्य प्राणीसदृश्य नखे 08 नग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासाठी वनविभागाच्य पथकाने वेशांतर करत बनावट ग्राहक बनून विक्रेत्यांशी व्यवहार केला. विक्रेत्याने अवशेष काढून दाखविले असता दुसऱ्या पथकाने कारवाई केली.
दोन दिवस पाहणी केली, वेशांतर करत बनावट ग्राहक बनवून पाठवले
या कारवाईसाठी गोदाकाठावर दोन दिवसांपासून पाहणी करत नजर ठेवण्यात आली होती. संशयितांकडून वन्य प्राण्यांचे अवशेष लपवून ठेवण्यात येत असल्याने खात्री पटत नव्हती. मात्र वनविभागाने वेशांतर करत बनावट ग्राहक पाठवून पथकाने रंगेहाथ पकडले.
सदर संशयित आरोपी इसम याची पुढील चौकशी नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, दक्षता विभागीय वनअधिकारी विशाल माळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे नाशिक हे करत आहेत. या प्रकरणातील पुढील कागदपत्रे आणि कार्यवाही नाशिक प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे हे करत आहेत.