(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Savarkar Death Anniversary : तरुणांना एकत्र केलं, इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं, 'नाशिकचं अभिनव भारत' ठरलं लढ्याचं केंद्र
Savarkar Death Anniversary : आजही नाशिकच्या तीळभांडेश्वर लेनमध्ये अभिनव भारत मंदिर इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
Savarkar Death Anniversary : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी नाशिकमधील तरुणांना एकत्र करत इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. नाशिकमध्ये अभिनव भारत हे सशस्त्र लढ्याचे केंद्र उभे केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर 1952 मध्ये सावरकर यांनी अभिनव भारतसह अन्य तीन संस्था विसर्जित केल्या असल्या तरी आजही नाशिकच्या तीळभांडेश्वर लेनमध्ये अभिनव भारत मंदिर इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. सावरकरांचं जन्मही नाशिकच्या (Nashik) भगूर येथील. त्यामुळे सावरकरांनी नाशिक हेच इंग्रजांविरुद्ध लढ्याचे केंद्र बनवले होते. अभिनव भारत (Abhinav Bharat) ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर 1899 मध्ये नाशिक येथे म्हसकर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. पुढे काहीच दिवसांनी 1 जानेवारी 1900 या दिवशी 'मित्रमेळा' ही त्या समूहाची प्रकट शाखा स्थापन करण्यात आली. तर 1904 मध्ये या संघटनेचे 'अभिनव भारत' असे नामकरण झाले. या संघटनेची व्याप्ती युरोपपर्यंत होती. या संघटनेत महाराष्ट्रातील शेकडो तरुण होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Vinayak Damodar Savarkar) ज्येष्ठ बंधू बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर, कनिष्ठ बंधू नारायण दामोदर सावरकर, स्वातंत्र्यकवी गोविंद, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा अश्याअनेक क्रांतिकारी तरुण होते. या संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध आणि मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला. अभिनव भारतने त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1952 मध्ये पुणे येथे भव्य समारंभ करून अभिनव भारत ही संस्था विसर्जित केली. मात्र आजही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत ही संस्था ज्या वाड्यात आहे, तो इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नाशिक जन्मभूमी. येथील क्रांतीची कथा सांगणारे अभिनव स्मारकाची वास्तू आजही इतिहासाच्या पानांनी धगधगत आहे. ही वास्तू म्हणजे एकप्रकारे सशस्त्र लढ्याचे केंद्रच होते. त्यामुळे सावरकरांच्या अनेक आठवणी अभिनव भारत सोबत जोडल्या आहेत. दरम्यान अभिनव भारत मधील स्मृती जपण्यासाठी येथील तुळशी वृंदावन, स्वातंत्र्य लक्ष्मीची मूर्ती, हुतात्म्यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात येत आहे. त्याचबरोबर अभिनव भारतच्या खोल्यांना बाबाराव सावरकर, अनंत कान्हेरे, कर्वे, विनायक देशपांडे आदी स्वातंत्र्यवीरांचे नावे देण्यात आली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर 1952 मध्ये सावरकर यांनी अभिनव भारतसह अन्य तीन संस्था विसर्जित केल्या असल्या तरी नाशिकमध्ये तीळभांडेश्वर लेनमध्ये आजही अभिनव भारत मंदिर आहे.
लोकवर्गणीतून वाडा परत मिळवला...
नाशिकच्या तीळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत संस्थेचे कार्यालय असलेला हा वाडा आजही इतिहासाची साक्ष देतो. मात्र स्वातंत्र्यानंतर हा वाडा मिळवण्यासाठी अनेकांना भांडावे लागले. शेवटी लोक वर्गणी करून हा वाडा मिळवला. यासाठी शासनाकडून एक दमडी न घेता लोकांकडून पैसे घेऊन वाडा मिळवला होता. यामध्ये केतकर, दातार, महाबळ गुरूजी, वर्तक, भट यासारख्या धुरिणांनी निधी संकलन केले. तर स्वा. सावरकर यांनी ठिकठिकणी व्याख्याने दिली. त्यातून मिळालेला निधीही त्यांनी या वाड्याच्या खरेदीसाठी दिल्याची येथील स्थानिक सांगतात.