Nashik Leopard Rescue : अखेर गिरणारे ग्रामस्थांच्या जिवाची घालमेल थांबली! दोन बिबटे जेरबंद
Nashik Leopard Rescue : गेल्या काही महिन्यांपासून दहशत पसरलेल्या गिरणारे परिसरात अखेर दोन बिबटे जेरबंद झाल्याने ग्रामस्थांच्या जीवाची घालमेल थांबली आहे.
Nashik Leopard Rescue : नाशिक (Nashik) शहरापासून जवळ असलेल्या गिरणारे परिसरात बिबट्याकडून (Lroapard) मानवी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण होते. अखेर सदर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला असून येथील तैनात केलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक पश्चिम पट्ट्यात असलेल्या गिरणारे, साडगाव, वडगाव आदी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामध्ये बिबट्याने काही नागरिकांना जखमी केले होते तर काही नागरिकांचा जीव घेतला होता. या पार्श्वभूमीवर वनवखात्याने परिसरात मोक्क्याच्या ठिकाणी आठ ते दहा पिंजरे तैनात केले होते. मात्र बिबट्या कडून सातत्याने हुलकावणी दिली जात होती.
अखेर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रौढ नर व मादी बिबट्या जेरबंद झाला आहे. गिरणारे पासून जवळ असलेल्या वाडगावमध्ये लावलेल्या पिंजऱ्यात तर दुगाव शिवारातील पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याची माहिती वनपाल शांताराम हांबरे यांना मिळाली. त्यांनी त्वरित वनरक्षकांना समवेत घटनास्थळी जाऊन खात्री पटवली. त्यानंतर त्यांनी नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला माहिती कळविल्यानंतर वन्यजीव रेस्क्यू वाहनातून बिबट्या जेरबंद झालेले पिंजरे घटनास्थळावरून सुरक्षितरित्या वनखात्याच्या रोपवाटिकेत हलवले.
दरम्यान गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणापासून जवळ असलेल्या गिरणारे शिवारात बिबट्या चे एकापाठोपाठ मानवी हल्ले झाल्याने दहशती वातावरण येथील शेतकरी व शेतमजुरांना मध्ये पसरले होते. वनविभागाकडून सातत्याने या भागात जनजागृती करीत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात होते. तसेच संभाव्य बिबट्या प्रवण क्षेत्रात चाचपणी करीत पाऊलखुणांचा शोध घेऊन कर्मचाऱ्यांकडून पिंजरे तैनात करण्यात आले. मात्र बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने नागरिकांच्या जीवाची घालमेल सुरू होती. अखेर दोन बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.
बिबट हल्ल्याचा घटनाक्रम
गेल्या काही महिन्यात गिरणारे बिबट्याची दहशत आहे. एप्रिलच्या 05 तारखेला गिरणारे साडगाव रोडवर बिबट्याच्या हल्ल्यात आदिती शंकर बागी ही मुलगी जखमी झाली होती. त्यानंतर पाच दिवसांनी गिरणारे येथे गावात पुन्हा बिबट्याने हल्ला करीत एकनाथ दहावाड या शेतमजुराला जखमी केले होते. तर गिरणारे पासून काही अंतरावर धोंडेगावात 27 एप्रिल रोजी रात्री गायत्री या चिमुकलीवर बिबट्याने झडप घातल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील सोमवारी 23 एप्रिल रोजी गिरणारे मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अरुण हिरामण गवळी हा हरसुलचा शेतमजूर ठार झाला होता.
नैसर्गिक अधिवासात मुक्तता
नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला माहिती कळविल्यावर वन्यजीव रेस्क्यू वाहनातून जेरबंद बिबटे घटनास्थळावरून सुरक्षितरित्या वनखात्याच्या रोपवाटिकेत हलविले. दोन्ही बिबट्यांचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सुरक्षित रित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली.