Nashik Road Accident : सिग्नलवर पोलीस नाही ना, मग सिग्नल पाळायचा नाही, ही मानसिकता बदला, पोलीस आयुक्तांचे आवाहन
Nashik Road Accident : वाहन चालवताना नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे (Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
Nashik Road Accident : 'कर्करोग ग्रस्ताला (Cancer) सुद्धा चांगले उपचार वेळेवर मिळाले, तर तो जगू शकतो', मात्र या आजारापेक्षाही जगण्याची कमी संधी रस्ते अपघातात मिळते, ज्यांना ही संधी मिळते ते लोक खूप नशीबवान ठरतात,' असे मत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Fansalkar) यांनी व्यक्त केले. नाशिक फर्स्ट : द अॅडवांटेज नाशिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवले जाणाऱ्या नाशिक ट्रॅफिक एज्युकेशन पार्कच्या वतीने जवळपास दोन लाख लोकांना वाहतूक नियमांचे पालन व रस्ते सुरक्षेचे धडे देण्यात आले.
सध्याच्या काळात वाहन चालवताना (Road Safety Rules) नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे (Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना प्रशिक्षण देण्यासाठी 'नाशिक फर्स्ट' या संस्थेने साकारलेल्या मुंबई नाका येथील 'ट्रॅफिक एज्युकेशन पार्क' (Nashik Traffic Education Park) मध्ये आजवर तब्बल दोन लाख नागरिकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या निमित्ताने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर बोलत होते. यावेळी फणसाळकर म्हणाले की, "सिग्नल यंत्रणेमागील उद्देश समजून घेतला जात नाही हे दुर्दैव आहे." सिग्नलवर पोलीस नाही ना मग सिग्नल पाळायचा नाही. ही मानसिकता लाजिरवाणी असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले. "ज्या दिवशी वाहतूक पोलिसाला एकही चलन करण्याची गरज पडणार नाही, तो दिवस त्याच्यासाठी सोन्याचा असेल, यासाठी सुजाण नागरिकांनी मी वाहतूक नियम तोडणार नाही, दंड भरणार नाही, अशी प्रतिज्ञा स्वयंस्फूर्तीने करावी," असेही आवाहन त्यांनी यावेळी केले
ते पुढे म्हणाले की, मी पहिला मुंबई पोलीस आयुक्त असेल की, ज्याने नाशिकला येऊन कार्यक्रमाला हजेरी लावली. मी अनेक प्रकारे या कार्यक्रमाला येण्याचे टाळले. कारण अर्ध्या एक तासाच्या कार्यक्रमासाठी चार तास येणे आणि चार तास जाणे, इतका वेळ घालवणे म्हणजे वेगळं आहे. मुंबई ट्रॅफिक पोलीस हे जगातील अग्रगण्य पोलीस दल समजले जाते. जगात जिथे उत्तम ट्रॅफिक चालतं, तिथे ट्रॅफिक पोलीस दिसत नाही. कारण त्या लोकांना हिरवा झाल्यावर जा आणि लाल झाल्यावर थांबा, असं म्हणण्याची गरज नसते. लायसन्स देण्याची प्रक्रिया टाईट करणे गरजेचे आहे. विदेशात लोक इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, पण त्यांना लायसन्स लवकर मिळत नाही. त्यासाठी अत्यंत खडतर परीक्षा असते.
सिग्नल यंत्रणा असल्यावर तिथे माणूस कशाला असायला हवा?
तसेच दिवाळीच्या काळात लोक पोलिसांकडे येतात, की फटाक्यांचा आवाज येतो. पण माझा प्रश्न आहे की, आपल्याकडे फटाक्यांसाठी उत्पादनासाठी का परवानगी आहे? सिंगल युज प्लास्टिक बॅन आहे, मग बाजारात का येतं? सिग्नल सिस्टिम ही जगात कॉमन आणि युनिव्हर्स आहे. सिग्नल यंत्रणा असल्यावर तिथे माणूस असण्याचा प्रश्नच येत नाही. पण भारतीय माणूस सिग्नल जम्प करतो. म्हणून आता सिग्नल पाळा, यासाठी पोलिसांना उभे करावे लागते. पोलिसांना कोण टार्गेट करत नाही? पण लोकांना आमच्याकडूनच अपेक्षा आणि विश्वास आहे. मुंबईत सर्वात जास्त मृत्युमुखी हे पादचारी पडतात. कारण गर्दी खूप आहे. अपघात हा मृत्यूचा अत्यंत घातक आणि दुर्दैवी प्रकार असल्याचे ते म्हणाले.