(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : लेकीला कुशीत घेऊन तिनं स्वतःलाही संपवलं, नाशिकमध्ये विवाहितेचा टोकाचा निर्णय
Nashik Crime : दिंडोरी (dindori) तालुक्यातील वणी गावात एका महिलेने दोन वर्षांच्या मुलीसह स्वतःला संपवल्याची (Suicide) घटना घडली आहे.
Nashik Crime : सध्याच्या धावपळीच्या जगात अनेक सामाजिक संकटाना माणसाला सामोरे जावे लागते. कधी घरगुती भांडण तर कधी समाजाकडून मिळणारी वागणूक अशामुळे अनेकजण मानसिक तणावाखाली जाऊन टोकाचे पाऊल उचलतात. असाच काहीसा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी परिसरात घडला आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (dindori) तालुक्यातील वणी गावात एका महिलेने दोन वर्षांच्या मुलीसह स्वतःला संपवल्याची (Suicide) घटना घडली आहे. एक विवाहित महिला सासरहून माहेरी काही दिवसांसाठी आली होती. मात्र घरी कुणी नसताना या महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला गळफास देऊन संपवलं आणि नंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वणी (Vani Police) पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वणी गावातील मोठा कोळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता विकास कराटे आणि तनुजा विकास कराटे अशी या मायलेकींची नावे आहेत. सविता कराटे ही काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी वणी येथे मुलीसह आली होती. उत्तम इंगळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार शेजारी राहणाऱ्या लिलाबाई पुंडलिक इंगळे यांच्या घरात सकाळपासून मोबाईल फोन वाजण्याचा आवाज येत होता. पण कोणीच फोन उचलत नाही, म्हणून मुलगा तुषार यास पाहण्यासाठी पाठवले असता आतून दरवाजा बंद असल्याचं समजलं. तेव्हा दरवाज्याच्या फटीतून पाहिले असता त्या विवाहितेने गळफास घेतल्याचे समोर आले. तसेच स्वतः खात्री करुन पोलिस स्टेशनला कळविले. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला असता विदारक दृश्य दिसले. दरम्यान सविता यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याबाबतचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून मात्र मुलीसह जीवन संपवण्याचा निर्णय कुटुंबीयांसह सर्वानाच धक्का देणार ठरला आहे.
मुलीसह आयुष्य संपविण्याचा निर्णय
दरम्यान मंगळवारी सकाळी नळाला पाणी आल्याने आजूबाजूच्या महिला पाणी भरत होत्या. मात्र सविता कुठे दिसत नव्हती. त्यामुळे शेजारच्या महिलांनी आवाज देण्याच्या प्रयत्न केला. पण त्यास कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी एका महिलेने याबाबत उत्तम इंगळे यांना सांगितले, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सविता हिने आई घरी नसतांना मुलीसह आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी वणी पोलिसांनी पंचनामा करून घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.