(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breast and Cervical Cancer : ब्रेस्ट आणि सर्व्हीकल कॅन्सरची यशस्वी तपासणी, देशातील पहिलाच प्रयोग नाशिक जिल्ह्यात
Breast and Cervical Cancer Test : भारतातील हा पहिलाच प्रयोग नाशिक जिल्ह्यात आशा स्वयंसेविकाच्या मदतीने राबविला जाणार आहे.
Nashik News : अलीकडच्या काळात महिलांमधील स्तनांचा कर्करोग (Brest Cancer) व गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमाण वाढले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अभिनव प्रकल्प राबविण्यात येत असून या दोन्ही कॅन्सरची तपासणी करण्याचे अद्ययावत यंत्रांचे लोकार्पण करण्यात आले आहे. शिवाय भारतातील हा पहिलाच प्रयोग नाशिक जिल्ह्यात आशा स्वयंसेविकाच्या मदतीने राबविला जाणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) आरोग्य विभागातर्फे महिला दिनानिमित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते सन 2021 – 22आर्थिक वर्षात सर्वाधिक कामावर आधारित मोबदला प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला. नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त (Women's Day) सर्वाधिक कामावर आधारित मोबदला प्राप्त करणाऱ्या आशा सेविकांचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या संकल्पनेतून महिलांमधील स्तनांचा कर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी जेनवर्क फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अद्ययावत यंत्राचे लोकापर्ण करण्यात आले.
दरम्यान पेठ तालुक्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून या यंत्राद्वारे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग हा नाशिक जिल्ह्यात आशा स्वयंसेविकाच्या मदतीने राबविला जाणार आहे. त्याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 9 मार्च ते 15 मार्च दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात महिला आरोग्य तपासणी शिबीर राबवले जात असून याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आशा सेविका या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. केंद्रीय पातळीवर आरोग्यासंबधी कुठलीही योजना राबवायची असेल तर या योजनेचा पायाभूत घटक हा आमच्या आशा सेविका असतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतले आशा सेविकांचे योगदान हे अनन्य साधारण आहे असे प्रतिपादन केले.
असा असणार पायलट प्रोजेक्ट
अनेकदा महिला वर्ग तपासणीसाठी बाहेर जात नाहीत. त्यामुळे स्क्रिनिंग होत नाही. त्यामुळे या यंत्राद्वारे घरोघरी जाऊन स्क्रिनिंग होणार आहे. त्यामुळे अवघ्या वीस मिनिटात ही तपासणी होऊन रिपोर्ट मिळणार आहे. आणि त्यामुळे महिलांमधील भीतीही कमी होणार आहे. अहवाल पॉसिटीव्ह असल्यास पुढच्या तपासणी प्रक्रियेसाठी सोप्पे होणार आहे. यातून कॅन्सरचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत भारतात पहिल्यांदा हा प्रयोग राबविण्यात येत असून नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील करंजाळी, कुभांडे, कोहोर अशा तीन आरोग्य केंद्रात या यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजना आणि who च्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
अंधश्रद्धेवर नाटिका सादर
दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागातून यावेळी आशा सेविकांनी हजेरी लावली. यावेळी संवादासह आशा सेविकांना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात यावर विचार मंथन करण्यात आले. त्याचबरोबर धोंडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटिकेचे सदरीकरण केले. ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैद्यकीय उपचार घ्यावे असा संदेश या नाटिकेतून देण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या नाटिकेबद्दल आशा सेविकांचे कौतुक केले. नाशिक तालुक्यातील आशा सेविका भारती वसंत ढिकले या आपल्या बाळासोबत कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांच्या सिद्धेश या बाळाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कडेवर घेवून आई असलेल्या आशा सेविका भारती ढिकले यांचा सत्कार केला.